फैजपूर मध्ये ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट सुरू असताना चित्रपटगृहात दगडफेक
फैजपूर,ता.यावल ,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सर्वत्र ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाची चर्चा सुरू असून या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत असताना फैजपूर येथील चित्रपटगृहात ‘द केरला स्टोरी’ चित्रपट सुरू असतांना दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली. त्या मुळे शहरातील वातावरण काही काळ तणावाचे बनले होते.
‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असतांनाच सर्वत्र महिला मोठ्या प्रमाणात हा चित्रपट पाहत आहेत. यावल तालुक्यातील फैजपुरात देखील या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत असून आज दुपारच्या शो ला देखील मोठी गर्दी होती. या वेळी चित्रपट सुरू असतांना एका प्रार्थनास्थळातून बाहेर पडलेल्या जमावाने चित्रपटाच्या पाठीमागून बाजूने पत्र्यांवर चित्रपटगृहावर जोरदार दगडफेक केली.
यामुळे परिसरात खळबळ उडाली. चित्रपट सुरू असताना झालेल्या या दगडफेकीचे शहरात देखील पडसाद उमटले. दगडफेक करतांना दोन जण आढळून आल्याने जमावाने त्यांना जोरदार चोप दिला. व मुख्यचौकात जमावाने रास्ता रोको आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला.
या प्रकाराची माहिती मिळताच फैजपूर पोलिसांनी धाव घेत वातावरण शांत केल्याने अनर्थ टळला. शहरात यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शहरात तणाव पूर्ण शांतता असून कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. या प्रकरणी सुमारे 40 उपद्रवींवर फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. चित्रपट गृहाचे चालक यांनी या प्रकरणी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
.