यावल तालुक्यात विमल गुटखा तस्करावर मोठी कारवाई, जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाकडून न्हावी गावात छापेमारी
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील फैजपूर येथून जवळच असलेल्या न्हावी गावातील सुनील किराणा दुकानात जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे पथकाने छापेमारी करत ७ लाख ३१ हजार ३२० रुपयांचा महाराष्ट्रात विक्री व बाळगण्यास प्रतिबंध असलेला व मानवी जीवनास अपायकारक असलेला तंबाखू जन्य सुगंधित केसरयुक्त विमल पान मसाला (गुटखा) जप्त केला.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार याना यावल तालुक्यातील फैजपूर पोलिस स्टेशन हद्दीत न्हावी गावातील सुनिल किराणा या नावाच्या दुकानात विमल गुटख्याचा मोठा साठा असल्याची माहिती मिळाली असता त्यांच्या पथकाने दि २८ मे रविवार रोजी सकाळी तीन वाजेच्या सुमारास (शनिवारी रात्री ) न्हावी येथील विक्की अशोक माखिजा याच्या सुनील किराणा दुकानातून प्रतिबंधित असलेला ७ लाख ३१ हजार ३२० रुपयांचा विमल गुटखा जप्त करण्यात आला असून सोबत मालक विक्की अशोक माखिजा वय ३९ वर्ष यास अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक एम राजकुमार याचे मार्गदर्शना खाली प्रशिक्षणार्थी पोलीस उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी व सपोनि निलेश वाघ यांनी केली असून या बाबत फैजपूर पोलिसस्टेशनला पोना राहुल चौधरी याचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, न्हावी गावातील सुनील किराणा या दुकान हे परिसरातील गुटखा विक्रीचे मध्यवर्ती केंद्र असून येथून परिसरातील सर्व आजूबाजूच्या खेड्यांवर दररोज लाखो रुपयांचा अवैध विमल गुटखा पोहचवला जात असून इतकेच नव्हे तर फैजपूर सह सावदा परिसरात सुद्धा विमल गुटखा पोहोच केला जातो. यातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल केली जात असून गेल्या कित्येक वर्षांपासून गुटखा विक्रीचे हे काम सुरू असून आतपर्यंत प्रशासनाच्या कसे लक्षात आले नाही हे नवलच आहे. आता कारवाई झाल्यावर गुटखा विक्रीचे हे मध्यवर्ती केंद्र किती दिवस बंद राहते , का दोन-चार दिवसात पुन्हा पूर्ववत सुरू होते ते पहाणे महत्वाचे ठरेल ! गुप्त माहिती जळगाव ला जिल्हा पोलीस अधीक्षक याना मिळते, मग स्थानिक पोलिसांना कशी मिळत नाही ?