यावल तहसीलदार महेश पवार कोरोना पॉझिटिव्ह असताना शासकीय कामकाज सुरू, दुसऱ्या अधिकाऱ्याकडे पदभार न दिल्यामुळे विपरीत परिणाम
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल (सुरेश पाटील)। यावल येथील तहसीलदार महेश पवार हे काल दि.16 पासून कोरोना पॉझिटिव्ह आहेत. ते अधिकृतरीत्या रजेवर गेलेले नाहीत तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांनी यावल तहसीलदार पदाचा पदभार दुसऱ्या कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्याकडे न दिल्यामुळे यावल तहसीलदार महेश पवार हे कोरोना पॉझिटिव्ह असताना स्वतः कामकाज करीत असल्याने संपूर्ण यावल तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो यामुळे महसूल कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने चिंताग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे
तहसीलदार महेश पवार हे दिनांक 16 पासून कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने व यावल तहसील मधील कर्मचारी व तहसील मध्ये तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांच्या भवितव्याच्या दृष्टिकोणातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्यांनी रितसर रजेवर जाणे आवश्यक होते आणि आहे परंतु त्यांनी तसे न करता आपल्या वैयक्तिक मर्जीनुसार शासकीय कामकाज सुरू ठेवून विविध दाखल्यांसाठी काही महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वतःच्या नावानिशी स्वाक्षरी करून शासकीय कामकाज सुरू ठेवले असल्याचा भक्कम पुरावा आज एका नागरिकाने आणून दिलेला आहे.
तरी यावल तहसीलदार पवार हे स्वतः आपल्या आरोग्याशी आणि यावल तालुक्यातील जनतेसह आपल्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची खेळ खेळत असल्याचे बोलले जात आहे. यावल तहसील मधील काही कर्मचारी तहसीलदार महेश पवार यांच्या संपर्कात जाऊन प्रकरणावर किंवा दाखल्यावर स्वाक्षरी कशी व का घेत आहेत तसेच कागद पत्र पेन यांच्या माध्यमातून कोरोना होत नाही का ? इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून याकडे प्रांताधिकारी कैलास कडलक यांनी आपले लक्ष केंद्रित करून जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे तात्काळ पत्रव्यवहार करून यावल तहसीलदार पदाचा कार्यभार दुसऱ्या कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्या कडे तात्काळ द्यावा अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.