यावल तालुक्यात विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू
फैजपूर, ता.यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील फैजपूर येथून जवळच असलेल्या रिधुरी शेत शिवारात वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली होती. विजेच्या झाडावरची झाडे पडली होती. त्यात वीज खांबावर पडलेली फांदी काढताना शॉक लागून १८ वर्षीय लोकेश सोनवणे या तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री घडली. घटनेमुळे रिधुरी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
यावल तालुक्यातील रिधुरी येथील लोकेश नारायण सोनवणे ,वय १८ वर्ष , हा तरुण वीज वितरण कंपनीत रोजंदारीवर कामे करतो. बुधवारी गावात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. त्यात गावालगत असलेल्या प्रकाश सोनवणे यांच्या शेतात झाडांच्या फांद्या वीज तारांवर पडल्या होत्या. या फांद्या हटवण्याचे काम लोकेश सोनवणे याला सांगितले होते. त्या प्रमाणे खांबावर पडलेली फांदी हटवताना लोकेशला विजेचा मोठा धक्का लागून तो जमीनीवर कोसळला. लोकेश याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतू डॉ. मोहिनी भुगवाड्या यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी फैजपूर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.