७२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल असलेली पर्स लांबविली
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। दुचाकीवरून किनगाव येथे जात असताना महिलेची पर्स चोरून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा एकुण ७२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार यावल- किनगाव रोडवर घडला.
या बाबत अधिक माहिती अशी की,मनीषा विजय खंबायत (वय-३०) रा. किनगाव ता. यावल.ह.मु. नाशिक या महिला बुधवारी १९ जानेवारी रोजी सायंकाळी नंदोई भाऊ दिनेश दिगंबर लिंबायत यांच्यासोबत दुचाकीने किनगाव येथे जात असताना त्यांच्या दुचाकीला लावलेली पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेली. यात सोन्याचे ब्रेसलेट, सोन्याच्या रिंगा आणि रोकड असा एकुण ७२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल पर्ससहित चोरून नेला आहे. याप्रकरणी मनीषा खंबायत यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.