Yawal : वादळी वाऱ्यामुळे घर कोसळल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू ; सुदैवाने बालक बचावला
यावल, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क | तालुक्यातील अनेक ठिकाणी काल झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने आंबा पाणी गावाजवळील थोरपाणी परिसरात एक घर कोसळून या दुर्घटनेत घरात झोपलेल्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली
यावल तालुक्यातील गेल्या दोन दिवसापासून वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पीक जमीनदोस्त झाले असून शेतकर्यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. तर रविवारी (दि २६) तालुक्यातील थोरपाणी या आदिवासी बहुल वाडीवस्तीवर वास्तव्यास असलेल्या पावरा कुटुंबावर काळाचा घाला झाल्यानें पती-पत्नी, लहान मुलगी आणि वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. सुदैवाने या घटनेतून ४ वर्षांचा चिमुकला थोडक्यात बचावला आहे.
वादळी वारा सुटल्यामुळे नानसिंग गुला पावरा यांचे कुटुंब हे दरवाजा बंद करून घरात बसलेले होते. इतक्यात वादळामुळे त्यांचे घर कोसळल्यामुळे नानसिंग, त्यांची पत्नी आणि तीन मुले असे एकूण पाच जण ढिगार्याखाली अडकले. त्यांना श्वास घेण्यासाठी अडचणी आल्यामुळे गुदमरून नानसिंग गुला पावरा ( वय २८ ) त्यांची पत्नी सोनूबाई नानसिंग पावरा ( वय २२) तसेच रतीलाल हा तीन वर्षाचा मुलगा तर बालीबाई असे जण मृत्युमुखी पडली. दरम्यान, या घटनेत ८ वर्षाचा मुलगा बचावला आहे. मात्र, या घटनेत अख्खं कुटुंबच संपलं आहे. यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
स्थानिकांकडून माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आहेत. आता मयतांचा वारसदार शांतीलाल पावरा याला शासकिय नियमानुसार भरीव मदत मिळावी, तसेच त्याच्या शिक्षणासह उपजिविकेची जबाबदारी शासनाने उचलावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.