यावल येथे शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। टेंभीकुरण येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून काम करत असलेल्या ३६ वर्षीय शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना यावल शहरातील समर्थ नगरात घडली आहे. विशाल बाबुराव गवळी ,वय-३६ रा. दहीवद ता. शिरपूर जि. धुळे ह.मु. स्वामी समर्थ नगर यावल असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून आत्महत्येमागील कारण अद्यापही कळू शकले नाही. दरम्यान, या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विशाल गवळी हे गेल्या १२ वर्षांपासून यावल तालुक्यातील टेंभीकुरण येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून काम करतात. दरम्यान काल मंगळवारी १४ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पत्नी आई-वडील व मुलासह जेवण करून रात्री झोपले. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करायचे कारण नेमके कळू शकले नाही. हा प्रकार आज बुधवार १५ सप्टेंबर रोजी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले.
पतीचा मृतदेह पाहून पत्नीने हंबरडा फोडला होता होता. त्यांचा मृतदेह उतरून यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी डॉ. शुभम तिळके यांनी त्यांचे शवविच्छेदन केले. याप्रकरणी यावल पोलिसांत लखीचंद पवार यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी करीत आहे.