यावलच्या किराणा दुकानदाराला हजारोंचा गंडा,चोराची सिनेस्टाईल पळवापळवी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल, मंडे टू मंडे वृत्तसेवा। यावल शहरात एका किराणा दुकानदाराला एका अज्ञात आरोपीने हजारो रुपयांचा गंडा घातला आहे. आपल्या आईच्या उत्तर कार्यासाठी सामान लागणार असल्याची बतावणी करुन चोरट्याने 30 हजारांचा किराणा घेतला. आरोपी कार घेऊन आला होता. पण त्याने आपण पैसे घरीच विसरल्याचे सांगून दुकानातील नोकराला आपल्यासोबत पाठवण्यास सांगितलं. आपण घरी पोहोचल्यावर नोकराकडे पैसे देवू, असं आरोपीने सांगितलं. पण चोरट्याने रस्त्यातच नोकराच्या जवळील मोबाईल हिसकावला आणि तो गाडीने पसार झाला. त्यानंतरही त्याने जी पळवापळवी केली त्याची शहरात चर्चा सुरु आहे.
नेमकं घडलं काय ?
यावल शहरात नाझीम खान यांच्या मालकीचे खानदेश प्रोव्हिजन किराणा दुकान आहे. नाझीम दुकानात असताना एक इसम तिथे आला. त्याने आपल्या आईचं उत्तर कार्य असल्याचे सांगून 30 हजारांचा माल खरेदी केला. यामध्ये 15 किलो तेलाचे पाच डब्बे, बासमती तांदूळ 75 किलो, 25 किलो मुगडाळ, एक-एक किलो काजू बदाम आणि मसाल्याचे इतर साहित्य असा 30 हजार रुपयांचा किराणामाल घेतला. त्यानंतर त्याने स्वत:च्या खिशात हात घातला. तसेच गाडीत पॅकेट शोधण्याचं नाटक केलं. पण पॅकेट मिळालं नाही, असं त्याने दुकानदाराला सांगितलं.
आरोपीने दुकानातील नोकराचा मोबाईल हिसकावला
“तुमचा माणूस माझ्यासोबत पाठवा. मी पैसे घरी विसरुन आलो आहे”, असे सांगून तो दुकानातील नोकराला घेऊन गेला. त्यानंतर त्याने नोकराला एका ठिकाणी थांबून त्याच्याजवळील मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर त्याला धक्का देवून तो गाडी घेऊन पसार झाला. नोकराने तातडीने दुकान गाठत आपल्यासोबत घडलेला हा सगळा प्रकार आपल्या मालकाला नाझीम खान यांना सांगितला. खान यांनी तातडीने यावल पोलिसांना माहिती दिली.
चोराची पळवापळवी पोलिसांची नाकाबंदी
पोलिसांना चोरीची घटना माहिती पडल्यानंतर त्यांनी तातडीने नाकाबंदी केली. त्यानंतर संशयित आरोपीने भुसावळकडे येतांना दोन दुचाकी चालकांना उडवले. त्यानंतर भुसावळ शहरात आल्यानंतर एका दुचाकी चालकालाही कट मारला. मात्र त्या दुचाकी चालकाने त्याचा पाठलाग केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्नात होता. पण तो तापी नगर भागामध्ये पुढे रस्ता नसल्याने फसला. पण चोर तिथेही थांबला नाही. त्याने गाडी तिथेच सोडली आणि तिथून पळून गेला.
विशेष म्हणजे संबंधित दुकानदाराला याआधी देखील दोन वेळा अशाचप्रकारे फसविण्यात आलं आहे. त्यामुळे यावल पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. खरंतर ही लुटणारी मोठी टोळीच असू शकते, असा संशय पोलिसांना आहे. पोलीस त्याच दृष्टीने आपला तपास करत आहेत.