तांदलवाडी येथील युवकांनी अवैध गुरांची वाहतूक करणारा ट्रक पकडला
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे प्रतिनिधी : मध्यप्रदेशातून येणारा तांदलवाडी जवळून मस्कावद सुनोदा मार्गे मांगलवाडी फाटयावरून हतनूर वरणगाव कडे जाणारा गुरे अपुऱ्या जागेत कोंबून कत्तल करीता वाहुन नेणारा अवैध वाहतुकीचा ट्रक पकडला गेला. या मुळे मोठी खळबळ उडाली आहे.
याआधी गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी रावेर तालुक्यातीलच चिनावल-उटखेडा दरम्यान असलेल्या सुकी नदीच्या पुलाखाली दि.१६ सप्टेंबर शुक्रवारी रोजी सकाळी तब्बल २२ बैल कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. यानंतर आता मध्य प्रदेशातून गुरे कोंबून वाहतूक करणारा ट्रक क्र. एम पी. १३ सी ए ९९५० व एम.पी.४१ जी ए. २५५८ या दोन नंबर असलेली आयशर ट्रक सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास येथील युवकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यास यश आले.सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अवैध गुरे वाहुन नेणारा अवैध वाहतुकीचा ट्रक मांगलवाडी सुनोदा फाटयावर अचानक बंद पडला. यावेळी येथील काही युवक हे व्यायाम करण्यासाठी जात असता त्यांना या ट्रकमध्ये मेलेल्या गुरांचा वास आल्याने त्यांना संशय आल्याने ट्रक चालकासह तिघांना हटकले असता त्या तिघांनी ट्रक तेथेच सोडून पलायन केले. प्रकरणी चालकासह तीन आरोपी पसार झाले आहेत.पसार आरोपीच्या शोधात रात्री उशिरापर्यंत पोलिस होते.
यावेळी ट्रकमध्ये ५० च्या आसपास गुरे असावेत त्यातील मयत २४ गुरे रस्त्याच्या कडेला जेसीबी ने गडडा करून पुरण्यात आले. तर जीवंत गुरांवर डॉ.निलेश राजपूत, डॉ.नेमाडे, डॉ.रविंद्र भोगे, डॉ.कडू तायडे, डॉ.प्रकाश तायडे, डॉ प्रकाश पाटील, यांसह आठ ते नऊ डॉक्टरांची टिम उपचारासाठी दाखल झाली होती. यातील जिवंत गुरांना परिसरातील ग्रामस्थ गुरांची परिस्थिती पाहून संवर्धनासाठी घेवून गेल्याचे समजते. घटनेच्या ठिकाणी गुरांसाठी पाण्याचे टॅंकर ग्रा.पं सदस्य शशांक पाटील, जेसीबी किशोर चौधरी यांनी उपलब्ध करून दिले. यावेळी माजी जि.प.उपाध्यक्ष नंदू महाजन, भाजपा युवा मोर्चा जिलाध्यक्ष श्रीकांत महाजन, यांचेसह ग्रामस्थांचे सहकार्यने व बजरंग दल पदाधिकारी असंख्य तरुणांनी गाडीतुन गुरे उतरवण्यास मदत केली. यावेळी रावेर पो.स्टे. एपीआय शितलकुमार नाईक, फैजपूर पो.स्टे.चे एपीआय सिध्देश्वर आखेगावकर, निंभोरा पो.स्टे.चे पो.उपनिरीक्षक काशिनाथ कोळंबे तसेच सावदा राखीव दल कर्मचारी यांनी परिस्थिती हाताळली व जमावाला शांत केले.