एटीएम कार्डाची अदलाबदल करून ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून १ लाख रुपये चोरले !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक (निशाद साळवे) :– येथे एका वृद्धांच्या एसबीआय बँकेच्या एटीएम कार्डाची अदलाबदल करून खात्यातून 1 लाख 500 रुपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार इंदिरानगरमधील बापू बंगल्याजवळील एसबीआयच्या एटीएममध्ये घडला आहे.
या घटनेची इंदिरानगर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की नाशिकरोड येथील सीएनपी प्रेसमधून सेवानिवृत्त झालेले मुनिरोद्दीन कासम शेख (वय 64, रा. कुतुब हौसिंग सोसायटी, जयहिंद कॉलनी, सेक्रेड हार्ट स्कूलजवळ, अशोका मार्ग) त्यांचा मुलगा हसीन मुंबई येथे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. त्यांनी मुंबई येथून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जेलरोड शाखेच्या खात्यामध्ये त्यांचा मोबाईल क्रमांकावरून दि. 10 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन 1 लाख रुपये ट्रान्स्फर केले. ते पैसे मुनिरोद्दीन शेख यांच्या एसबीआय बँकेच्या खात्यात जमा झाले किंवा नाहीत याबाबत ते मिनी स्टेटमेंट काढण्यासाठी दि. 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बापू बंगल्याजवळील एस. बी. आय. बँकेचे एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकून मिनी स्टेटमेंट काढण्याचा प्रयत्न केला असता पावती आली नाही म्हणून त्यांनी पुन्हा प्रयत्न केला असता पाठीमागे उभा असलेली एक अनोळखी व्यक्ती त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने जवळ आली. त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन बोलण्याच्या नादात त्यांच्याकडे असलेले एस. बी. आय. बँकेच्या एटीएम कार्डाची अदलाबदल करून त्याच्याकडे असलेले एसबीआय बँकेचे साहेबराव शंकर गोडसे यांच्या नावाचे एटीएम कार्ड त्यांना दिले. नंतर शेख यांनी पुन्हा एकदा स्टेटमेंटसाठी प्रयत्न केला असता सदर व्यक्ती तेथून बाहेर निघून गेली.
स्टेटमेंटची पावती येत नसल्याने सदर एटीएम कार्ड काढून ते घरी गेले. दि. 15 फेब्रुवारी रोजी मुलगा वसिम याने त्यांचा मोबाईल चेक करून मोबाईलमध्ये असलेला मेसेज पाहून तो म्हणाला, की तुम्ही बँकेतून पैसे काढले का? पैसे काढले नसल्याचे सांगितल्यानंर वसिम याने ते कार्ड घेऊन बोधलेनगर येथील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये गेला. तेथे गेल्यावर हे कार्ड वेगळ्या नावाचे असल्याचे समजले. त्यावर साहेबराव शंकर गोडसे असे नाव आहे, असे समजताच ते तातडीने एसबीआय बँकेचे पासबुक घेऊन बोधलेनगर एसबीआय बँकेत गेले. बँकेत पासबुक भरून घेतले तेव्हा लक्षात आले, की एसबीआय बँकेच्या 30680801172 या क्रमांकाच्या खात्यातून कोणी तरी व्यक्तीने दि. 13 फेब्रुवारी रोजी चौधरी प्लाझा येथील आयसीआयसीआय बँकेच्या राजीवनगर एटीएममधून चार वेळा 10 हजार रुपयांप्रमाणे 40 हजार रुपये काढून घेतले.
त्यानंतर दि. 14 फेब्रुवारी रोजी आयसीआयसीआय बँकेच्या इंदिरानगर येथील एटीएम मशीनमधून चार वेळेस दहा हजार रुपये असे 40 हजार रुपये, तर 15 फेब्रुवारी रोजी 10 हजार रुपये दोन वेळेस, तर 500 रुपये बँक ऑफ महाराष्ट्रच्या इंदिरानगर एटीएममधून काढून घेतले. याप्रमाणे 1 लाख 500 रुपये त्यांच्या एसबीआय खात्यातून काढून घेतल्याचे समजले. त्यानंतर शेख यांनी त्यांचे एटीएम कार्ड लॉक केले. या फसवणुकीप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक उघडे अधिक तपास करीत आहेत.