कझाकस्तानमध्ये ‘अज्ञात न्यूमोनियाची’ साथ कोरोना संक्रमणामुळे पसरली – WHO
नवी दिल्ली: कझाकस्तानमध्ये अज्ञात न्यूमोनियाने सर्वांना हैराण करुन सोडलं आहे. अज्ञात न्यूमोनिया कोरोनापेक्षा घातक असल्याचा दावा चीनने केला होता. यावर आता जागतिक आरोग्य संघटनेने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कझाकस्तानमध्ये अज्ञात न्यूमोनियाची साथ ही कोरोना विषाणूमुळे पसरली असावी, असं जागतिक आरोग्य संघटनेचे हेल्थ इमर्जन्सी प्रोग्रामचे कार्यकारी संचालक मायकाल जे. रायन यांनी म्हटलं आहे.
WHO स्थानिक प्रशासनासह कझाकस्तानमधील एक्स-रे अहवालांचा आढावा घेत आहे आणि ही प्रकरणे कोरोना संसर्गाशी संबंधित आहेत का याबाबत तपास करत आहेत, असं मायकाल जे. रायन म्हणाले. गेल्या आठवड्यात कझाकस्तान प्रशासनाने केलेल्या तपासणीनंतर १० हजार पेक्षा जास्त कोरोना प्रकरणं समोर आली आहेत. रायन म्हणाले की, मंगळवारी कझाकस्तानमध्ये जवळपास ५० हजार प्रकरणे नोंदली गेली असून त्यामध्ये २६३ लोकांचा मृत्यू झाला आहे. न्यूमोनियाच्या इतर लोकांचे अहवाल चुकून निगेटिव्ह आले नाहीत ना, याबाबतचा तपास करत आहोत. आम्हाला विश्वास आहे की कझाकस्तानमध्ये न्यूमोनियाची नोंद केलेली अनेक प्रकरणे कोरोनाची आहेत. WHO ची टीम आधीच कझाकस्तानमध्ये आहे. आम्ही त्यांचे गांभीर्याने निरीक्षण करीत आहोत.
हेही वाचा – कोरोना संदर्भात WHO चे मोठे विधान, कोरोना कायमचा जाण्याची शक्यता कमी !
जगाच्या बर्याच भागात कोरोना नियंत्रित नाही आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस गेब्रेयेसस म्हणाले. सध्याच्या काळात सर्वात मोठा धोका कोरोनाचा नसून जागतिक व राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व व एकतेचा आहे. एक विभाजित जग म्हणून आम्ही या साथीला पराभूत करू शकत नाही. कोरोना संकट ही जागतिक एकता आणि जागतिक नेतृत्त्वाची परीक्षा आहे.