कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ! यावल पोलिस निरीक्षक अरुण धनवडे ना राजोरा प्रकरण अंगलट ?
यावल (प्रतिनिधी)। यावल तालुक्यातील राजोरा येथील अल्पवयीन मुलीला तरुणाने पळवून नेल्या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत ,सदर प्रकरण अंगलट आल्याने यावलचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांची उचलबांगडी करण्यात आल्याची चर्चा आहे , तसेच धनवडेंसह यावलच्या उपनिरीक्षक सुनीता कोळपकर यांचीही बदली करण्यात आली असल्याचीही चर्चा परिसरात ऐकायला मिळते, धनवडे यांची मानव संसाधन विभागात बदली करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की यावल तालुक्यातील राजोरा येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस १० ऑक्टोबर रोजी एका तरुणाने पळवून नेले होते. या गुन्ह्यात संशयितास १३ ऑक्टोबरला मुलीसह पोलिस ठाण्यात आणले होते. यावेळी पोलिस निरीक्षक अरूण धनवडे यांनी संशयितावर कारवाई केली नाही. मुलीची वैद्यकीय तपासणी देखील केली नाही. त्यामुळे मुलीच्या पालकांनी पोलिस निरीक्षक धनवडे यांची जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्याकडे तक्रार केली होती. या प्रकरणी स्थानिक आमदार शिरीष चौधरी यांनीही गृहमंत्र्याकडे तक्रार केली होती ,या गुन्ह्याचा तपास फैजपूरचे डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांच्याकडे देण्यात आला. हेच सर्व प्रकरण निरीक्षक धनवडे यांना अंगलट आल्याने बदली झाल्याची चर्चा आहे.