जळगावसामाजिक

केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात सरकार अपयशी– आ. गिरीश महाजन

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या असून त्या सोडवाव्यात, जेणेकरून त्यांची काही दिवसांनी येऊन ठेपलेली दिवाळी गोड जाईल असे म्हणत माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत कोणत्याही प्रकारचे बदल झालेले नाही. त्यामुळे समस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार असुन केळी पीक विमा काढण्याची मुदत सुद्धा संपलेली आहे. शेतकरी संभ्रमात आहे. तसेच शासन निर्णय २०२०-२१ मधुन केळी पिक विमा योजनेचे प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई मध्ये केलेल्या बदलामुळे शेतकरी बांधावामध्ये नाराजीचे वातावरण तयार झालेले आहे.
पुर्वी सलग ३ दिवस किमान ८ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास २५ हजार रु. देय होते. नविन जि.आर. नुसार सलग ५-७ दिवस किमान ८ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास ९ हजार रु. देय आहे. दिनांक ०१ मे २०२० ते ३१ मे २०२० सलग ५ दिवस ४५ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त गेल्यास ४१००० रु. देय होते. नविन जि.आर. नुसार सलग ८ दिवस ४५ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त गेल्यास १३५०० रु. देय आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने काढलेला हा जि.आर. अन्यायकारक आहे.

दि. ०५ जुन २०२० रोजी लागू केलेली प्रमाणके ही कमी जादा तापमानात कधीही लागु होणार नाही आणि मागील सलग किमान ०५ वर्षाची तापमानाची आकडेवारी पाहता असे सलग कमी किंवा जादा
तापमान कधीही दिसून आले नाही आज रोजी किमान २ ते ३ दिवस जरी तापमानात कमी जादा प्रमाणात बदल झाला तरीही केळी पिक पूर्णत: खराब होवुन जाते आणि केळी निसवणीवर गंभीर परिणाम होऊन उत्पादन कमी होते असे शेतकऱ्यांचे स्पष्ट मत आहे, असेही निवेदनात नमूद आहे.

यावेळी आमदार गिरीष महाजन, जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे, खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेष पाटील, आ.मंगेश चव्हाण. आ.चंदुलाल पटेल, जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजनाताई पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, विस्तारक सचिन पानपाटील, मनपा गटनेते भगत बालानी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, डाॅ. राधेश्याम चौधरी, सुरेश धनके, पोपट भोळे, रावेर पंचायत समितीचे जितु पाटील, श्रीकांत महाजन, यावल पंचायत समिती सभापती पुलजित चौधरी, नारायण बापु, रावेर तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, संदिप सावळे, सविता भालेराव, उज्वला माळके, निला चौधरी, अमोल शिंदे, सुनिल काळे आदींसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!