केळी, सोयाबीन, ज्वारी, कापूस सह ईतर पिकांची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याच्या खा. रक्षा खडसे यांच्या प्रांतअधिकाऱ्यांना सूचना
मुक्ताईनगर : – चोपडा, रावेर, यावल, भुसावळ तालुक्यात 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी झालेल्या जोराचे वादळी वारे व मुसळधार पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उभे पीक भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास कालच्या वादळी वारे व पावसाने हिसकावून घेतला तर ज्वारी, कापूस, भुईमूग, सोयाबीन, कांदा, मका, बाजरी, केळी, पपई फळ बागांचेही मोठे नुकसान झाले आहे.
अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने दोन दिवसांपासून पुन्हा जोरदार पाऊस बरसल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्यामुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसासोबत वारे वाहू लागल्याने अनेक ठिकाणी पीक भुई सपाट झाले आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. केळी पिकासह अन्य पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी कमालीचा आर्थिक संकटात सापडला आहे. प्रशासन सोयाबीन, ज्वारी, कापूस, भुईमूग, केळी फळबागांची पिकांची पाहणी करून तात्काळ पंचनामे करावेत अशा सूचना खासदार रक्षाताई खडसे यांनी संबंधित प्रांतअधिकारी यांना दिल्या आहेत.