“कोरोना” नकोरे बाबा,दुबईला चला,दहापट भाडं लागलं तरी चालेल…
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई (वृत्तसंस्था)। इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती आणखी बिकट बनत चालली आहे. सध्या जगभर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.देशात दररोज साडेतीन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होतं आहे. याचा प्रचंड ताण आरोग्य यंत्रणांवर पडत आहे. एकीकडे देशात कोरोना स्थिती बिघडत असताना अनेक भारतीय दुबईला निघून जात असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या धाकान अनेक भारतीय दुबईला जाण्यासाठी दहापट प्रवास भाडं सुदधा द्यायला तयार आहेत. तर अनेकजण खाजगी विमानानं दुबईला जाण्याची योजना आखत असल्याची महिती समोर येत आहे,अशा परिस्थितीत खाजगी विमानांची मागणी वाढताना दिसत आहे. असं असलं तरी, भारतातून युएईला जाणाऱ्या सर्व प्रकारच्या विमानावर युएई सरकारने बंदी घातली आहे.
मीडिया माहिती नुसार, सामान्य स्थितीत भारत आणि युएई हा हवाई मार्ग सर्वात व्यस्त मानला जातो. या दोन्ही देशात दर आठवड्याला 300 हून अधिक उड्डाणे केली जातात. सध्या कोरोना साथीमुळे अनेक निर्बंध लादले असले तरी, दुबईला जाणाऱ्या भारतीयांचं प्रमाण वाढताना दिसत आहे.
विमानांच्या तिकीटांची तुलना करणाऱ्या वेब साइट्सच्या मते, मुंबईहून दुबईला जाणाऱ्या कमर्शिअल विमानाचं प्रवास भाडं दहापट म्हणजे 80 हजारावर गेलं म्हणजे दहापट अधिक आहे. तर दुसरीकडे दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या विमानांच्या प्रवास भाड्यात पाचपट वाढ झाली आहे. दिल्लीहून दुबईला जाण्यासाठी सध्या 50 हजारापेक्षा अधिक रुपये आकारले जात आहेत. पण अचानक रविवारी युएई देशाने भारतीय उड्डाणांवर काही निर्बंध घातल्याने अनेक भारतीय देशातच अडकून पडल्याने त्याची कोंडी झाली.
आज तकने एका एअर चार्टर सर्विस कंपनीच्या प्रवक्त्याचा हवाला देत म्हटलं की, दुबईला जाण्यासाठी भारतीयांकडून प्रायव्हेट जेटच्या मागणीत वाढ होतं आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, उद्या एकूण 12 विमानं दुबईला जाणार आहेत. या विमानातील सर्व जागांची बुकिंग झाली आहे. दुसऱ्या एका अधिकाऱ्याच्या मते काही लोकं, ग्रुप बनवून प्रायव्हेट विमान बुक करण्याचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय थायलंडला जाणाऱ्या विमानांबाबतही चौकशी केली जात आहे. पण यात सर्वाधिक मागणी दुबईला जाण्यासाठी असल्याची पुष्टीही संबंधित अधिकाऱ्यानं केली आहे.