कोरोना रुग्णांचे अतिरिक्त उकळलेले बिल परत करण्याचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी)। येथील ब्रेन अक्झॉन हॉस्पिटलने कोविड रुग्णाकडून अतिरिक्त घेतलेले बिल रुग्णास परत करण्याचे आदेश आक्षेप निवारण समितीने काढले आहेत.
याबाबत अधिक अशी की, ब्रेन अक्झॉन हॉस्पिटलमध्ये कोविडवर उपचार घेणाऱ्या रुग्णास अतिरिक्त बिल देण्यात आले होते. यासंदर्भात त्यांच्या नातेवाईकांनी सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्याकडे लेखी तक्रार करून कोविडच्या उपचारासाठी ६ लाख ४० हजारांचे बिल घेण्यात आले . श्री. गुप्ता यांनी जिल्हाधिकारी अभिजित राउत व मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करून हॉस्पिटलने जादा रक्कम घेऊन बिल दिले असल्याचे निदर्शनास आणून रुग्णाकडून घेतलेली जादा रक्कम परत करण्यात यावी अशी मागणी केली. यासंदर्भात श्री. गुप्ता यांनी वारंवार पाठपुरावा केला. याबाबत आक्षेप निवारण समितीने हॉस्पिटलने त्या रुग्णास दिलेले औषधोपचारचे बिलाचे अवलोकन केले असता शासकीय नियमानुसार बिल आकारण्यात आले नसल्याचे आढळून आले. यात २ लाख ४४ हजार रुपयांचे जादा घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले असता समितीने ब्रेन अक्झॉन हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉ. निलेश किनगे यांना खुलासा सादर करण्याचे सांगितले. मात्र, त्यांनी संधी देऊनही समितीपुढे कोणताही खुलासा सादर न केल्याने त्या रुग्णाकडून घेतलेले २ लाख ४४ हजारांचे जादा बिल परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या मुळे जास्त बिल घेणाऱ्यां मध्ये खडबड उडाली आहे.