कोरोना विषाणूचे रूप बदलतेय, लस विकसित करण्यात मदत होणार; शास्त्रज्ञांच्या दावा !
नवी दिल्ली: कोरोना विषाणूचा जगभरात कहर सुरू असून त्याला आळा घालण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहे. संशोधन करण्यात येत आहे, ब्रिटनच्या बाथ विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनामध्ये कोरोना विषाणूबाबत नवीन माहिती समोर आली आहे. कोरोनाचा विषाणू आपले रुप बदलत असल्याचा खुलासा ब्रिटीश संशोधकांनी केला आहे. कोरोना विषाणूमध्ये होणाऱ्या या बदलांमुळे लस विकसित करण्यात मोठी मदत होणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार नव्या माहितीचा उपयोग विषाणूंचा खात्मा करण्यासाठी लस विकसित करण्यासाठी होणार आहे. कोरोना विषाणूचे काही म्युटेशन मानवाच्या रोग प्रतिकारशक्ती प्रणालीशी संबंधित एका प्रोटीनशी मिळतेजुळते आहे. त्यामुळे करोनाचा विषाणू कमजोर होऊ शकतो. मात्र, करोनाचा विषाणू याविरोधात पुन्हा सक्रिय होत असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.
हे संशोधन प्रसिद्ध मॉलिक्यूलर बॉयलॉजी अॅण्ड इव्होल्यूशन या नियतकालिकेत प्रकाशित झाले आहे. वैज्ञानिकांनी जगभरातील १५ हजारांहून अधिक विषाणूंच्या जीनोमचे आकलन करून सहा हजारांहून अधिक म्युटेशनची ओळख पटवली. ब्रिटनच्या बाथ विद्यापीठाच्या अॅलन राइस यांच्यासहित इतर सहभागी संशोधकांनी सांगितले की, जेव्हा म्यूटेशन (आकार बदलतात) करतात तेव्हा ही प्रक्रिया सामान्य पणे आकस्मिक असते. मात्र, करोना विषाणूच्या बाबतीत ही प्रक्रिया आकस्मिकपणे नसावी असा दावा संशोधकांनी केला आहे.