कोरोना संरक्षण, जनजागृतीसाठी यावल पोलिसांनी काढली प्रचंड रॅली, यावल शहरातून व ग्रामीण भागातून उत्तम प्रतिसाद !
यावल (प्रतिनिधी)। यावल पोलिसांकडून कोरोनाविषाणू संरक्षणासाठी व जनजागृतीसाठी यावल शहरातून व ग्रामीण भागातून जनजागृती रॅली काढून साकळी, किनगाव, दहिगांव, कोरपावली इत्यादी ग्रामीण भागात पोलीस निरीक्षक अरुण धनवडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नागरिकांना प्रबोधन करून कोरोनाविषाणू संदर्भात मार्गदर्शक सूचना करून प्रबोधन केले यात त्यांना सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळाला.
रविवार दिनांक 19 रोजी सकाळी संपूर्ण यावल शहरात पोलिसांनी कोरोना पासून बचाव कसा करता येईल, प्रवास टाळा, घरातून वारंवार बाहेर जाऊ नका, घरातून बाहेर पडताना जी काही कामे असतील ती एकाच वेळेला करून घ्या प्रत्येक कामासाठी वारंवार घराबाहेर जाऊ नका, पुरेशी झोप घ्या, आपली प्रत्येकाची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी किंवा कायम राहणेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. माक्सचा वापर करा प्रत्येक वेळेला सर्व ठिकाणी सोशल डिस्टन्स ठेवून चर्चा किंवा आपले काम करून घ्यायला पाहिजे तसेच कोरोना विषाणू संदर्भात जनजागृती बाबत हातात विविध घोषवाक्याचे फलक घेऊन शहरात पथसंचलन करण्यात आले, पोलीस वाहनावरील ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी नागरिकांना जाहीर आव्हान करून सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला कोरोना संदर्भात जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या या रॅलीने संपूर्ण यावल शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते, याच प्रमाणे साकळी, किनगांव, दहीगांव, कोरपावली इत्यादी ग्रामीण भागात यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी रॅली काढून प्रबोधन केले. साकळी, किनगांव, दहिगांव, कोरपावली या गावांमध्ये कोरोना बाधित अधिक रुग्ण आढळुन आले असल्याने पोलीस पथक, होमगार्ड पथक आणि तालुक्यातील पोलीस पाटलांनी ग्रामस्थांना मोठ्या संख्येने एकत्र आणून भव्य रॅली काढली.
रॅलीमध्ये पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, विनोद खांडबहाले, सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी, सुशील घुगे, मुजफ्फर खान, यांच्यासह इतर पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड पथक सहभागी होते. ग्रामीण भागात प्रत्येक गांवातील पोलिस पाटील पोलिसांच्या रॅलीत सहभागी झाले होते. नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलिसांनी कोरोना विषाणुबाबत जनजागृती साठी एक सामाजिक आगळावेगळा उपक्रम राबविल्याने यावल पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.