गळफास घेतलेल्या आईजवळ चिठ्ठी सह मुलाचाही मृतदेह आढळल्याने खळबळ
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
मंडे टू मंडे वृत्तसेवा, नाशिक: शहरातील पाथर्डी फाटा परिसरात काल एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या खोलीतच तिच्या साडेतीन वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
शिखा सागर पाठक (वय 32) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून, तिच्या मृतदेहाजवळच तिचा साडेतीन वर्षांचा मुलगा रिधानचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिखा यांच्या घरातील बैठकीच्या खोलीत त्यांचे आई-वडील बसलेले होते. यावेळी शिखा त्यांच्या मुलाला घेऊन बेडरूममध्ये गेल्या. या ठिकाणी त्यांनी एक चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. आत्महत्येस कोणीही जबाबदार नसल्याचा उल्लेख चिठ्ठीत करण्यात आला आहे.
दरम्यान, शिखा यांनी उशीने तोंड दाबून मुलाचा खून केला असावा व नंतर गळफास घेतला असावा, असा अंदाज पोलीस सूत्रांनी वर्तविला आहे. शिखा यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत तपासणी केली. यावेळी त्याच खोलीत शिखा यांचा मुलगा मृतावस्थेत आढळला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.