गिरणा नदीत ममुराबाद येथील बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला !
जळगाव (प्रतिनिधी) – गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी फूफनगरी परिसरातील गिरणा नदीत सापडला. तो मतिमंद असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.
याबाबात अधिक माहिती अशी की, श्रीराम आत्माराम पाटील (वय 30) असे मृत तरुणाचे नाव आहे. तालुक्यातील ममुराबाद येथील इंदिरानगरात श्रीराम हा मोठा भाऊ सुनील पाटील, आई जिजाबाई यांच्यासमवेत वास्तव्यास होता. सुनील हा दोन
दिवसांपूर्वी तो नेहमीप्रमाणे घरी जेवण झाल्यानंतर बाहेर पडला, कुटुंबियांना वाटले श्रीराम सायंकाळी परत येईल, मात्र तो आला नाही. म्हणून भाऊ सुनील यांच्यासह गावातील तरुणांनी त्याचा परिसरात शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही, शुक्रवारी दुपारी फुफनगरी येथील पोलीस पाटील नामदेव मोहन चौधरी यांना गुरे चारणाऱ्या तरुणांनी गिरणा नदी काठावर मृतदेह पडलेला असल्याची माहिती दिली. त्यानुसार नामदेव चौधरी यांनी हा प्रकार तालुका पोलिसांना कळविला व घटनास्थळ गाठले. संबंधित मयत तरुणाच्या अंगातील टीशर्टवर ममुराबाद गावाचे नाव असल्याने पोलीस पाटील चौधरी यांनी ममुराबाद
येथील पोलीस पाटील आशाबाई पाटील यांचे पती धनराज पाटील यांना संपर्क साधला. व्हॉटस्अपवर फोटो मागवून धनराज पाटील यांनी ओळख पटविली असता, तो गावातील श्रीराम पाटील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार कुटुंबियांनी घटनास्थळ
गाठले.
मिळालेल्या माहितीनुसार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश भांडारकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास पाटील, हरिलाल पाटील या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. तसेच पंचनामा करुन मृतदेह खाजगी वाहनातुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. मयत श्रीराम हा मतीमंद असल्याचे त्याचा मोठा भाऊ सुनील पाटील यांनी बोलतांना सांगितले. सुनील हा विवाहित आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.