चिंताजनक; राजभवनावर कोरोनाचे आक्रमण १६ कर्मचारी बाधित !
राजभवनावरील 100 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यात आतापर्यंत 55 जणांचे अहवाल हाती आले आहे.
मुंबई : देशासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. सर्वाधिक रुग्ण हे राज्याची राजधानी मुंबईत आढळले असतांना आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे निवासस्थान असलेले राज्यभवन कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. राजभवनावर 16 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे.
राजभवनातील एका इलेक्ट्रीशियनला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तब्बल १०० जणांची कोरोना चाचणी केली असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली. या माहितीच्या आधारे आतापर्यंत आलेल्या अहवालानुसार १६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात सर्वात आधी एक वायरमॅन कोरोनाचा पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्याची सर्वात आधी चाचणी करण्यात आली होती. अद्याप 45 लोकांचे कोरोनाचे रिपोर्ट येणे बाकी आहे. तर दुसरीकडे राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली नाही. खबरदारी म्हणून राज्यपाल स्वत: क्वारंटाउन राहत आहे.
दरम्यान, मुंबईत बॉलिवूडमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यापाठोपाठ त्यांचा मुलगा अमिताभ बच्चन याचाही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
अमिताभ यांनी स्वतःच त्यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी Tweet करून दिली. आता मुलगा अभिषेकसुद्धा पॉझिटिव्ह आला आहे. अमिताभ यांच्या जलसा आणि जनक या बंगल्यात राहणाऱ्या सर्वांची आता COVID चाचणी होणार आहे. मुंबईतील नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) त्यांना दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ यांच्या चाहत्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी करू नये यासाठी नानावटी हॉस्पिटलबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.