चीनची दादागिरी मोडून काढणार!; भारतासाठी ‘या’ देशाचे सैन्य सज्ज
नवी दिल्ली: चीनच्या वाढत्या विस्तारवादी धोरणामुळे चीनच्या शेजारील देशांसह जगभरातील इतर देशांमध्येही चीनविरोधात रोष वाढत आहे. चीनची दादागिरी भारताविरोधात असो किंवा अन्यत्र आम्ही सहन करणार नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. चीनचा एकही शेजारचा देश सुरक्षित नसल्याचेही अमेरिकेने म्हटले आहे. चीनविरोधात आमची भूमिका कठोर राहणार असल्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे चीफ ऑफ स्टाफ मार्क मेडोस यांनी म्हटले आहे. दक्षिण चीन समु्द्रात अमेरिका आणि चीनचे नौदल एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यावर मेडोस यांनी म्हटले की, आम्ही मौन धारण करू शकत नाही. चीन किंवा इतर कोणालाही आगळीक करू देणार नाही. आमची सैनिकी ताकद मजबूत असून यापुढेही ती आणखी मजबूत असणार. मग, हा संघर्ष भारत आणि चीन दरम्यानचा असो किंवा अन्य भागात असो. अमेरिका चीनला प्रत्युत्तर देण्यास सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिका अजूनही जगातील सर्वात प्रभावी आणि सर्वश्रेष्ठ लष्करी ताकद आहे, हे जगाला लक्षात आणून देणे आवश्यक असल्याचे मेडोस यांनी सांगितले. भारत आणि चीनमध्ये युद्ध झाल्यास अमेरिका भारताच्या बाजूने उभी राहणार असल्याचे व्हाइट हाऊसने स्पष्ट केले आहे.
चीनने तैवानवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर तैवानच्या संरक्षणासाठी अमेरिकेचे नौदल दक्षिण चीन समु्द्रात दाखल झाले आहे. त्यातच आता अमेरिकेने दोन विमानवाहू युद्धनौका दक्षिण चीन समुद्र परिसरात दाखल केल्या आहेत. त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला आहे. दक्षिण चीन समुद्र परिसरात चीनसह इतरही काही देशांचा दावा आहे. चीन सातत्याने आपल्याकडील भागात लष्करी बळ वाढवत आहे. त्याशिवाय काही बेटांवर चीनच्या लष्कराकडून बांधकाम सुरू असल्याचीही माहिती समोर आली आहे. विमान आणि क्षेपणास्त्रांसाठी लाँचिंग पॅड बनवण्याची तयारी चीनकडून सुरू असल्याची चर्चा आहे. दक्षिण चीन समुद्रातून मोठ्या प्रमाणावर जलवाहतूक होते. यामध्ये तेलाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. त्याशिवाय नैसर्गिक वायू आणि तेलाचे साठेही या भागात आहेत. त्यासाठी चीनकडून या भागावर सातत्याने दावा सांगण्यात येतो. व्हिएतनाम, फिलीपाइन्स, इंडोनेशिया, ब्रुनेई, तैवान आदी देशांच्या सागरी सीमाही या भागात आहेत. त्यामुळे या देशांकडूनही दक्षिण चीन समुद्रातील भागांवर दावा करण्यात येतो.