देशभरातील ५८ टक्के कोरोना रुग्ण एकट्या महाराष्ट्रात, चाचण्याची संख्या घटल्याने केंद्राची नाराजी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन ।
मुंबई ( प्रतिनिधी )महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी नाराजी व्यक्त केली. देशभरातील टॉप १० सक्रिय कोरोना केसेस जिल्ह्यांपैकी महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांचा समावेश आहे. देशभरातील ५८ टक्के कोरोनाबाधित रुग्ण फक्त एकट्या महाराष्ट्रात आढळत आहे. तसेच महाराष्ट्रातील कोरोना चाचणी करण्याचे प्रमाण घटले आहे, अशी माहिती देत राजेश भूषण यांनी महाराष्ट्राबाबत चिंता व्यक्त करताना दिली.
सक्रिय कोरोना केसेस असलेल्या टॉप १० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातले एकूण सात जिल्हे मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद आणि अहमदनगर या सात जिल्ह्यांचा समावेश आहे. उर्वरित कर्नाटकातील बेंगळूरू अर्बन, छत्तीसगढमधील दुर्ग आणि दिल्ली हे टॉप १० जिल्ह्यांमध्ये आहे.
राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात ३ हजार रुग्ण प्रतिदिन आढळत होते. पण आता ४० हजारांहून अधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळत आहेत. देशभरातील ५८ टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आढळत आहेत. तसेच फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ३२ रुग्णांचा मृत्यू होत होता. पण आता २५० जणांचा मृत्यू प्रतिदिन होत आहे. महाराष्ट्रातील ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी आरटीपीसीआर चाचणीच्या प्रमाणात घट झाली आहे, अशी नाराजी केंद्राकडून व्यक्त करण्यात आली आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ७१.६ टक्के आरटीपीसीआर चाचण्या होत होत्या. पण मागील आठवड्यात चाचण्याच्या प्रमाणात घसरण होऊन ६०.१ टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे चाचण्याचे प्रमाण वाढवण्याचे आदेश दिले असून महाराष्ट्रात कठीण भागात मोबाईल टेस्टिंग लॅब उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारला आयसीएमआर मदत करत असल्याचे, राजेश भूषण यांनी सांगितले.