भाजप हा विचारधारेवर चालणारा पक्ष, पक्ष्यातून कोणीही जाणार नाही– गिरीश महाजन
जळगाव (प्रतिनिधी)। एकनाथराव खडसे यांच्या जाण्याने काही खिंडार वगैरे पडणार नसून त्यांच्या सोबत कुणीही जाणार नसल्याचा दावा करून भाजप हा विचार धारेवर चालणार पक्ष असून कुणी पक्षातून गेल्याचा काहीही परिणाम होणार नाही असे आज माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी सांगितले . पक्षाच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या कोअर समितीच्या बैठकीनंतर महाजन बोलत होते.
माजी मंत्री गिरीश महाजन व पक्षाचे संगठन मंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत, एकनाथराव खडसे यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आज पहिल्यांदाच भाजपच्या कोअर समितीची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी महाजन म्हणाले की, भाजपची आजची बैठक ही नियमीत या प्रकारातील असून कार्यकारिणीची निवड करण्यासाठी ही बैठक घेण्यात आलेली आहे. पत्रकारांनी या वेळी त्यांना खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत विचारले असता ते म्हणाले की, भाजप हा विचारधारेवर चालणारा पक्ष असून कुणी पक्षातून गेल्याचा काहीही परिणाम होणार नाही. एकनाथराव खडसे यांच्या जाण्याने काही खिंडार वगैरे पडणार नसून त्यांच्या सोबत कुणीही जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले तसेच कोअर समितीच्या आजच्या बैठकीला खासदार रक्षा खडसे यांनी अनुपस्थिती दर्शविल्याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, रक्षाताई या दिल्ली येथे महत्वाची बैठक असल्याने आज गैरहजर होत्या. त्यांनी याबाबत आधीच अधिकृत परवानगी घेतलेली आहे. दोन दिवसानंतर त्या पक्षाच्या सर्व कार्यक्रमांना हजर राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे तीन पायांच्या शर्यती सारखे असल्याचा टोलाही त्यांनी मारला , मराठा आरक्षणावरून सरकारच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली.