भारताला खास मित्राचं बळ; चीनला टक्कर देण्यासाठी पाठवणार लष्कर
चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे आशियामध्ये अशांतता; तणाव वाढला
नवी दिल्ली: विस्तारवादी धोरणामुळे अनेक देशांसोबत सीमावाद उकरून काढणाऱ्या चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी आता अमेरिकेनं कंबर कसली आहे. कोरोना संकटामुळे अमेरिका आणि चीनचे संबंध बिघडले आहेत. त्यात आता चीनच्या विस्तारवादी भूमिकेमुळे आशियामध्ये निर्माण झालेल्या तणावाची भर पडली आहे. त्यामुळे आता अमेरिका आपलं युरोपमध्ये तैनात असलेलं सैन्य आशियामध्ये तैनात करणार आहे.
अमेरिका सर्वप्रथम जर्मनीतून आपलं सैन्य हटवणार आहे. जर्मनीत अमेरिकेचे ५२ हजार सैनिक तैनात आहेत. त्यातले ९,५०० सैनिक आशियामध्ये हलवले जाणार आहेत. लडाखमधील सीमावादावरून चीन आणि भारताचे संबंध बिघडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं घेतलेला हा निर्णय अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपीन्स या देशांनाही चीनकडून धोका आहे. त्यामुळेच अमेरिकेनं आशिया खंडात सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
चीनमुळे भारतासोबतच आग्नेय आशियाला धोका निर्माण झाल्याचं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो म्हणाले. ‘चीनमुळे भारत, मलेशिया, इंडोनेशिया आणि फिलिपीन्ससारख्या आशियाई देशांसमोर आव्हान उभं राहिलं आहे. त्यामुळेच अमेरिकेकडून जगभरात तैनात असलेल्या सैन्याचा आढावा घेतला जात आहे. आवश्यकता भासल्यास त्यांना चिनी सैन्याचा मुकाबला करण्यासाठी तैनात केलं जाईल,’ असं पॉम्पियो म्हणाले. ते जर्मन मार्शल फंडच्या व्हर्च्युअल ब्रसेल्स फोरममध्ये बोलत होते.
पीपल्स लिबरेशन आर्मीशी (चिनी सैन्य) दोन हात करण्याच्या दृष्टीनं आमची तयारी सुरू असल्याची माहिती पॉम्पियो यांनी दिली. ‘चिनी लष्कराच्या कारवाया सध्याच्या घडीचं मोठं आव्हान आहेत आणि त्यांचा सामना करण्यासाठी सर्व संसाधनं योग्य ठिकाणी असावीत यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार सैनिकांच्या तैनातीचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे जर्मनीत सेवा बजावत असलेल्या सैनिकांची संख्या कमी केली जाईल. सध्या जर्मनीत अमेरिकेचे ५२ हजार सैनिक कर्तव्य बजावत आहेत. ही संख्या २५ हजारांवर आणली जाईल,’ असं पॉम्पियो यांनी सांगितलं.