मद्य विक्रेत्यांकडून शासकीय आदेशाची पायमल्ली; रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू, सोशल डिस्टन्स घातले खड्ड्यात !
यावल (सुरेश पाटील)। यावल रावेर तालुक्यात संपूर्ण भुसावळ विभागात मद्य विक्रेत्यांन पैकी 90 टक्के परवानाधारक आणि अनधिकृत मद्यविक्री दुकानदार सकाळी रामप्रहरा पासून तर रात्री उशिरापर्यंत आपली मद्यविक्री दुकाने सुरू ठेवून शासनाचे तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जळगाव आणि राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक जळगाव यांचे आदेशाची पायमल्ली करीत असल्याचे संपूर्ण भुसावळ विभागात नागरीकांमध्ये बोलले जात आहे.
यावल रावेर तालुक्यात किनगांव, साकळी, यावल, भालोद, बामणोद, फैजपूर, निंभोरा, रावेर इत्यादी परिसरासह संपूर्ण भुसावळ विभागात अनेक परवानाधारक अधिकृत परमिट रूम बियरबार, बिअर दुकान, देशी-विदेशी दारू विक्रेत्यांन पैकी 90 टक्के मद्यविक्री दुकाने तसेच अवैध अनधिकृत रित्या देशी-विदेशी, गावठी हातभट्टीची, पन्नीतील दारू विक्रेते कोरोनाविषाणू च्या महाभयंकर वातावरणात आणि परिस्थितीत आपली अनेक दुकाने सकाळी रामप्रहरा पासून तर रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत सर्रासपणे उशिरापर्यंत मद्य विक्री करीत आहे यात काही जेवणाच्या ढाब्यावरती सुद्धा ऑर्डरप्रमाणे देशी-विदेशी किंवा बियर गावठी दारू उपलब्ध करून दिली जाते. तर काही जेवणाच्या ढाब्यावर फक्त पार्सलची सुविधा असताना सोशल डिस्टन्स खड्ड्यात घालून तसेच मास न लावता मोठ्या गर्दीमध्ये जेवणाचे कार्यक्रम सुद्धा सुरू आहेत.
सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत मद्यविक्री दुकाने सुरू ठेवण्याचे स्पष्ट आदेश असताना 90 टक्के मद्य विक्रेते शासनाचे आदेशाची पायमल्ली करीत सर्रासपणे देशी-विदेशी दारू विक्री करीत आहे याच बरोबर अवैध अनधिकृत देशी-विदेशी हातभट्टीची बनावट दारू पन्नी मधील दारू उघडपणे ठिक- ठिकाणी वाजवीपेक्षा जास्त दराने सर्रासपणे विक्री करण्यात येत आहे. यात काही खानावळ रेस्टॉरंट, शुद्ध शाकाहारी, मासांहारी जेवणाचे ठिकाण हॉटेल ढाब्यावर सुद्धा रात्री उशिरापर्यंत जेवणाची गर्दी असते. यांना कोणी काही बोलले असता आम्ही ठराविक काही पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागातील काही संबंधितांची खाण्यापिण्याची व्यवस्था करून दरमहा हप्ता पोच करीत असतो. त्यामुळे आमच्यावर कोणीही काहीही कार्यवाही करू शकत नाही असा दम मद्य प्राशन करणाऱ्यांसह इतर नागरिकांना दिला जात आहे.
तरी राज्य उत्पादन शुल्क जळगाव जिल्हा अधीक्षक, जिल्हाधिकारी जळगाव तथा जिल्हा दंडाधिकारी जळगाव, पोलीस अधीक्षक जळगाव, यांनी संयुक्तीक मोहीम राबवून शासनाचे आदेशाची पायमल्ली करणाऱ्या मद्य विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करून परवाने निलंबित करण्याची कार्यवाही करावी अशी संपूर्ण भुसावळ विभागातून मागणी होत आहे.