मुख्यमंत्र्यांना आव्हान; धाडस असेल तर इतर वाहिन्यांना मुलाखत द्या’- प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
मुंबई (वृत्तसंस्था): दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दै. सामनाने मुलाखत घेतली आहे. राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या मुलाखतीची जोरदार चर्चा आहे. यावर विरोधकांनी टिका करत ही मुलाखत तर मॅचफिक्सिंगसारखीच, असल्याचे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ही मुलाखत दैनिकाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे.
काल या मुलाखतीचा दुसरा भाग सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यामध्ये असून प्रसार माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची सामनामध्ये मुलाखत म्हणजे एक प्रकारे मॅचफिक्सिंगच आहे. धाडस असेल तर इतर वृत्त वाहिन्यांनाही मुलाखत द्या, त्यांच्या संपादकांच्या प्रश्नांना उत्तरे द्या. त्यांनी राज्यातील कोरोनाच्या स्थितीवर भाष्य करताना सांगितले की, राज्यातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. काळजी करण्यासारखे काही नसल्याचे सांगितले जात असले तरी काळजी करण्यासारखे खूप काही आहे. परिस्थिती भयावह आहे. तसेच सध्या दोन मुख्यमंत्री आहेत. एक मुख्यमंत्री मातोश्रीत बसून राज्य चालवत आहेत. तर दुसरे महाराष्ट्रभर फिरून महाराष्ट्र चालवत आहेत, आता तुम्हीच ओळखा ते कोण आहेत, दरम्यान, त्यांनी पुन्हा एकदा घरामध्ये बसणारे मुख्यमंत्री असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.