यावल तालुक्यात गुंडगिरीसह अवैध सावकारी, शेतकऱ्यांवर मोठा अन्याय; सावकारी प्रकरणात तक्रारदाराची गळचेपी आणि अनधिकृत न्यायनिवाडा !
यावल दि.15 (प्रतिनिधी)। यावल तालुक्यात अनेक ठिकाणी गुंडगिरीने अवैध सावकारी तसेच काही मोठे व्यवसायिक शासनाचे सर्व नियम धाब्यावर ठेवून अवाचे सव्वा व्याज बिना पावतीने आकारून धमक्या देऊन शेतकऱ्यांची नागरिकांची मोठी आर्थिक पिळवणूक, फसवणूक करीत आहेत. पोलीस स्टेशनला लेखी तक्रार असताना सावकारांच्या आर्थिक, सामाजिक राजकीय प्रभावाला बळी पडून पोलीस स्टेशनमध्ये सावकारी प्रकरणात तक्रारदाराची गळचेपी करून अनधिकृत न्यायनिवाडा केला जात असल्याचे संपूर्ण तालुक्यात बोलले जात आहे.
हेही वाचा- फास सुटेना! कोरोना मृत्यूपेक्षा ग्रामीण भागात आत्महत्येचे प्रमाण जास्त; धक्कादायक वास्तव
यावल तालुक्यातील काही सावकार आणि त्याचे काही कट्टर समर्थक हे आपल्या सामाजिक,आर्थिक व राजकीय प्रभावा मुळे दररोज संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून काही अधिकाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आणि इतर विविध कार्यक्रमातून अधिकाऱ्यांसोबत फोटो काढून व्हाट्सअप, फेसबुक इत्यादी माध्यमातून प्रसिद्धी करून आपल्या व्यवसायिक माध्यमातून संबंधितांवर प्रभाव टाकीत असतात. त्यामुळे या काही अनधिकृत व्यवसायिकांच्या आणि सावकारांच्या विरोधात कोणी काही तक्रार केल्यास अधिकारी तक्रारदारांवर अनेक अनेक प्रश्नांची सरबत्ती करून सावकारी प्रकरणात तक्रारदाराची गळचेपी करून अनधिकृतपणे न्यायनिवाडा करून घेत असतात यात मात्र शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक, मानसिक एक नुकसान होत असल्याच्या घटना तालुक्यात घडल्या आहेत.
सावकारी प्रकरणात लेखी तक्रार असताना किंवा तक्रारदार आर्थिक संकटात कशाप्रकारे आला याची माहिती तक्रारदाराने पत्रकारास दिली असता पत्रकाराला माहिती का दिली ? असा दम भरायला सुद्धा पोलीस मागेपुढे बघत नसल्याचे एका तक्रारदाराने सांगितल्यावरून समजले, परंतु पत्रकार हा लोकशाहीचा चौथा खांब आहे याची जाणीव संबंधित ठेवत नसल्याने प्रसिद्धी माध्यमांसमोर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
यावल पोलीस स्टेशनला अवैध सावकारी बाबत कोणाची तक्रार आल्यास यावल पोलिसांनी त्या तक्रारदारास प्रथम संरक्षण देण्याची रितसर कारवाई करून, कायदेशीर सल्ला देऊन अवैध सावकारी असल्याने उपनिबंधक जळगाव यांच्याकडे स्पष्ट अहवाल पाठवून पुढील कार्यवाही करावी किंवा तक्रारीनुसार अवैध सावकाराने तक्रारदाराची कोणती प्रॉपर्टी, वस्तू , वाहन, शेत आपल्या ताब्यात किंवा कब्जात करून घेतली आहे किंवा नाही आणि याबाबत कायद्यानुसार लेखी दस्तऐवज काय काय केलेले आहेत ? याची प्रथम दर्शनी यावल पोलिसांनी कडक कारवाई नि:पक्षपणे वेळ पडल्यास संबंधित ठिकाणावर अचानक धाड टाकून मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई केली पाहिजे, आणि त्या सावकाराकडे सावकारी व्यवसायातून इतर काही शेतकऱ्यांची नागरिकांची अवैध प्रॉपर्टी सोने,चांदी नाणे वाहने तारण म्हणून ठेवली आहे का ? किंवा जप्त करून ठेवलेली आहेत किंवा नाही याची चौकशी करून कारवाई करायला पाहिजे असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे. जुलै 2020 महिन्यात अशाच प्रकारे डी.वाय.एस.पी.फैजपुर, व यावल पोलीस स्टेशनला सावकारी संबंधात एक गंभीर स्वरूपाची लेखी तक्रार रजिस्टर पोस्टाने प्राप्त झालेली असल्याने डीवायएसपी फैजपूर आणि यावल पोलीस निरीक्षक काय कारवाई करतात याकडे संपूर्ण यावल तालुक्याचे लक्ष वेधून आहे.