राज्यात कुठल्याही क्षणी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होण्याची दाट शक्यता.
मंडे टू मंडे वृत्तसंकलन ।
मुंबईः (विशेष प्रतिनिधी)। लॉकडाऊन हा उपाय नसला, तरी कोरोना संसर्गाची साखळी तोडायला दुसरा उपाय नाही. त्यामुळे उद्या-परवा काही कडक निर्बंध लावावे लागतील. वेगळा काही उपाय मिळाला नाही, तर लॉकडाऊनला पर्याय नाही, असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी फेसबुक लाईव्हदरम्यान दिला असून कोरोना रुग्ण वाढल्यास डॉक्टर आणि नर्सेस आणायचे कुठून?, या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं ठोस उत्तर मिळत नसल्यानं राज्यात कुठल्याही क्षणी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते, अशी माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने हालचालीही सुरू केल्याचं समजतं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेला संबोधित केल्यानंतर आज विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करून त्यांची मतं जाणून घेतली. संपूर्ण लॉकडाऊन न करता, वाढती रुग्णसंख्या रोखता येईल का, यादृष्टीने विचारविनिमय करण्यात आला. टेस्टिंग सेंटर्स, बेड्स, हॉस्पिटल्स, ऑक्सिजन पुरवठा या सुविधा वाढवणं प्रशासनाने वर्षभरात वाढवल्या आहेत, त्या आणखीही वाढवता येतील. मात्र, रुग्णसंख्येला पुरे पडू शकतील एवढे डॉक्टर-नर्सेस कुठून उपलब्ध होतील, हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यामुळे लॉकडाऊनशिवाय कुठलाही पर्याय राज्य सरकारसमोर सध्या तरी नाही.
कोरोनाचा राज्यात हाहाकार सुरू असताना रुग्णसंख्येची वाढ अशीच कायम राहिली तर येत्या १० ते १५ दिवसांत सर्व बेड्स आणि संसाधनं अपुरी पडू लागतील, असं स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केलं होतं. “राज्यात लसीकरण मोहिम मोठ्या पातळीवर सुरू आहे. आपण आरोग्य सेवांमध्येही वाढ करत आहोत. पण कोरोनाची साखळी नेमकी तोडायची कशी? यावर अद्याप लॉकडाऊन शिवाय इतर दुसरा कोणताच उपाय नाही. लॉकडाऊन आज जाहीर करत नसलो, तरी इशारा देतोय. दोन दिवसांत याबाबतचा निर्णय आणि निमावली जाहीर केली जाईल”, असंही मुख्यमंत्री म्हणाले होते.
महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून विक्रमी वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी राज्यात तब्बल ४७ हजार ८२७ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर २४ हजार १२६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात २०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी राज्याची चिंता वाढवणारी मात्र नक्कीच आहे.