राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे शिवसेनेपेक्षा जलद होतात, सेना आमदारांचा नाराजीचा सूर !
मुंबई (वृत्तसंस्था)। शिवसेना आमदारांची पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत रविवारी व्हर्च्युअल बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेचे आमदारांनी नाराजीचा सुर आळवला आहे. शिवसेनेच्या आमदारांपेक्षा राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे जलद होतात, अशी नाराजी सेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्याकडे व्यक्त केली. याआधी लॉकडाऊनचा कालावधी, प्रशासकीय, सनदी आणि पोलीस अधिकारी यांच्या बदल्यांवरुन राष्ट्रवादी-शिवसेनेत मतभेद असल्याचं समोर आलं होतं.
उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थमंत्री असल्याने त्यांच्या पक्षातील आमदारांची कामे पटापट होतात, असं सेना आमदारांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या आमदारांच्या कामांना हवी तशी गती मिळत नसल्याची खंत आमदारांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. त्यामुळे आता सेनेच्या आमदारांची नाराज मुख्यमंत्री कशी दुर करणार हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांच्या मागण्यांकडे विशेष लक्ष देता यावे म्हणून आमदार रवींद्र वायकर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. सेना आमदारांच्या मागण्या समजून घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवण्याची जबाबदारी आहे वायकर यांच्याकडे देण्यात आली आहे. या मागण्यांचा सातत्याने पाठपुरावा व्हावा आणि लवकरात लवकर कामं व्हावीत असा या मागील उद्देश असल्याचं बोललं जात आहे.