Video। रेमेडीसेव्हिर इंजेक्शनचा जळगाव जिल्ह्यात तुटवडा, सरकार झोपलं काय?– गिरीश महाजन
मंडे टू मंडे वृत्तसंकलन ।
जळगाव : (प्रतिनिधी)। महाराष्ट्रात एकीकडे कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णासाठी जीवनदायी ठरलेल्या रेमेडीसेव्हर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने रुग्णांना मरणावर सोडले का ? असा सवाल माजी मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला .
जळगाव जिल्ह्यासह बुलडाणा, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. तसेच मृत्यूच्या प्रमाणातही वाढ होत आहे. आज अनेक रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. तसेच कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमेडिसेव्हिर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. या इंजेक्शनसाठी जास्त रक्कम देऊनही ते उपलब्ध होत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पाचोरा, चोपडासह इतर ठिकाणची स्थिती अतिशय गंभीर झाली आहे. या इंजेक्शन अभावी रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र तरीही शासन कोणतीही उपाययोजना करत असल्याचे दिसत नाही, असेही गिरीश महाजन म्हणाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात इंजेक्शन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, असे सांगितले आहे. मग ते रुग्णांना का मिळत नाही. त्याचा काळाबाजार होत आहे का? याचा तपास शासनाने करावा. तसेच झोपेतून जागे होऊन इंजेक्शनचा पुरेसा पुरवठा करुन त्यांचे जीव वाचवावे, अशी मागणीही त्यांनी केली.
महाराष्ट्र राज्यातील कोरोनाची स्थिती अत्यंत विदारक बनत चालली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह अनेक शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची वाढ होते आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा चिंताजनक बनला आहे. राज्यात काल दिवसभरात तब्बल 47 हजार 827 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 24 हजार 126 जण कोरोनामुक्त झाले आहेत. काल दिवसभरात 202 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून राज्यात सध्या 3 लाख 89 हजार 832 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 84.62 टक्के झालं आहे. तर राज्यातील मृत्यूदर 1.91 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या 21 लाख 1 हजार 999 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 19 हजार 237 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले.