लेकीच्या लग्नात आईच बनली नवरी; मुलीचं केलं कन्यादान आणि स्वत: घेतले सात फेरे
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
लखनऊ (वृत्तसंस्था) : प्रत्येक लग्नात काही ना काही असं घडतं, जे प्रत्येकाच्या कायम लक्षात राहतं. फक्त वधू-वर आणि त्यांचं कुटुंबच नाही तर वऱ्हाड्यांही तो क्षण विसरू शकत नाही. असंच काहीसं घडलं ते एका लग्नात. जिथं लेकीच्या लग्नाच आईच नवरी म्हणून उभी राहिली. लेकीचं कन्यादान केलं आणि त्याच मंडपात आईनं सात फेरे घेतले आहे.
हा अनोखा विवाहसोहळा पार पडला आहे तो उत्तर प्रदेशच्या (uttar pradesh) गोरखपूरमध्ये. एकाच मंडपात आई आणि मुलीनं लग्न केलं आहे. एकाच वेळी मायलेकी लग्नबंधनात अडकल्या आहेत. नवभारत टाइम्सच्या रिपोर्टनुसार गोरखपूरमध्ये सामूहिक विवाहसोहळा आयोजित करण्यात आला होता. तिथं एकूण 63 जोडप्यांची एकाच वेळी लग्नं झाली. पिपरॉलीमध्ये राहणाऱ्या बेला देवी यांच्या मुलीचंही लग्न इथंच होत होते. त्यांना एकूण पाच मुलं. त्यापैकी चौघांचं लग्न झालं होतं. ही त्यांची सर्वात छोटी मुलगी इंदू. पालीतल्या राहुलशी तिचं लग्न ठरलं. सामूहिक विवाहसोळ्यात त्यांचं लग्न झालं. आई म्हणून बेला देवी यांनी आपल्या मुलीचं कन्यादान केलं. आपलं कर्तव्य पार पाडलं आणि त्यानंतर त्या नवरीसारख्या नटूनथटून आल्या आणि याच मंडपात त्यांनीही लग्न केलं.
25 वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचं लग्न झालं होतं. त्यांना दोन मुलं आणि तीन मुली. मुलांना आपापल्या संसाराला लावून आपली जबाबदारी पार पाडून बेला देवी एकट्या राहिल्या होत्या. म्हणजे त्यांना मुलं होती पण पुढील आयुष्य घालवण्यासाठी आयुष्याचा जोडीदार नव्हता. त्यामुळे मुलांच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडला. त्यांनी 55 वर्षीय दीर जगदीश यांच्यासह लग्न केलं. कुरमोमध्ये राहणारे जगदीश हे तीन भावांमध्ये सर्वात लहान. ते अविवाहित होते. जेव्हा सामूहिक लग्नाबाबत दोघांनाही समजलं तेव्हा दोघांनीही आपल्या मुलांचा आणि कुटुंबाची संमती घेतली आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. मायलेकीच्या या लग्नाची चर्चाच सर्वत्र होऊ लागली.