संपूर्ण लॉकडाऊन की कठोर निर्बंध? इकडे राज्यात, तिकडे केंद्रात तातडीच्या बैठका;
मंडे टू मंडे वृत्तसंकलन ।
मुंबई (विशेष प्रतिनिधी)। राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या गाईडलाईन आज सायंकाळी जाहीर करण्यात येण्याची दाट शक्यता आहे.
राज्यातच नव्हे तर देशात कोरोनाची मगरमीठी घट्ट होत चालली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 93,249 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 60,048 रुग्ण बरे झाले आहेत. 513 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 5 महिन्यांतील उच्चांक असल्याने आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली वेगवेगळ्या हायलेव्हल बैठका आहेत. यामुळे राज्यात लॉकडाऊन लागणार की निर्बंध आणखी कठोर केले जाणार यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावली असून ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे यामध्ये आज सायंकाळी नव्या गाईडलाईन ठरविण्य़ात येणार असल्याचे समजते. या गाईडलाईन आज सायंकाळी जाहीर करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 3 वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील प्रसारमाध्यमांच्या संपादकांशी बोलताना आता लॉकडाऊन करण्याची वेळ आल्याचे सांगितले होते. हळूहळू निर्बंध लादून लोक ऐकत नाहीत. यामुळे आधी संपूर्ण लॉकडाऊन आणि नंतर हळूहळू सूट देण्याची योजना असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले. आधीच पुण्यात मिनी लॉकडाऊन सुरु झाला आहे. तसाच मुंबईतही सुरु करून उर्वरित राज्यात अन्य नियम लागू केले जाण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई, पुण्यासारख्या कोरोना विस्फोट झालेल्या जिल्ह्यांसाठी वेगळे नियम आणि जिल्हावार वेगळे निर्बंध असण्याची शक्यता आहे. सत्ताधारी मित्रपक्षांसह विरोधी पक्षांचा संपूर्ण लॉकडाऊनला विरोध आहे. काही पक्षांनी सरकारच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर येण्याचा इशारा दिला आहे. तर उद्धव ठाकरे यांनी रस्त्यावर उतरा पण कोरोना निर्मुलनासाठी असे आवाहन केले आहे.
तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने दिल्लीत उच्च स्तरिय बैठक बोलावली आहे. यामध्ये सचिवांपासून केंद्रीय मंत्री सहभागी झाले आहेत. यामध्ये वाढत्या कोरोनावर का उपाय योजता येतील, यावर चर्चा होणार आहे. तसेच राज्यांना निर्णय घेता येत नसेल तर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काय करता येईल हे देखील पाहिले जाणार आहे. या बैठकीला कॅबिनेट सचिव, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, डॉ. विनोद पॉल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आहेत.