सावधान! पेटीएम अपडेटच्या नावाखाली खात्यातून लाखो रुपये काढले
पेटीएम अपडेट करतो असं सांगून सायबर चोरट्याने एका ज्येष्ठ नागरिकाला लाखो रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुणे: पेटीएम अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने एका ज्येष्ठ नागरिकाला एक लाख ११ हजार रुपयांचा गंडा घातला. गेल्या आठवड्याभरात पेटीएम अपडेटच्या नावाखाली करण्यात आलेल्या फसवणुकीचा हा तिसरा प्रकार समोर आला आहे.
याबाबत संजीव खत्री (वय ६१, रा. रम्यनगरी सोसायटी, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खत्री खासगी कंपनीमधून सेवानिवृत्त झाले असून ते कुटुंबासहित बिबवेवाडीत राहतात. सायबर चोरट्याने त्यांना मेसेज करून पेटीएम केवायसी अपडेट करण्यासाठी मोबाइलवर संपर्क करण्यास सांगितले. अन्यथा पेटीएम खाते बंद होईल असेही सांगितले. ऑनलाइन व्यवहार बंद झाल्यास अडचण येऊ नये यासाठी खत्री यांनी संबंधित मोबाइल फोनवर संपर्क केला. त्यानंतर सायबर चोरट्यांनी सांगितल्याप्रमाणे खत्री त्यांना एक रुपयाचे ऑनलाइन ट्रान्झॅक्शन केले. या दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती विचारून ऑनलाइन एक लाख ११ हजार रुपये वर्ग करून घेतले. बँक खात्यातून रक्कम कमी झाल्याचा मेसेज आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे खत्री यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी पोलिस निरीक्षक मुरलीधर खोकले तपास करीत आहेत.