यावल

रस्त्यावर नाल्यात भराव टाकून नैसर्गिक प्रवाह बंद करून जमीन लाटण्याचा गोरखधंदा; महसूल व नगरपरिषदेचे दुर्लक्ष !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

यावल (सुरेश पाटील)। यावल येथील एस.टी.बसस्टँड पासून हाकेच्या अंतरावर तसेच फैजपुर रोडवरील श्री मनुदेवी मंदिराला लागून असलेल्या नाला सदृश्य सोमवार रस्त्यावर एका भल्या मोठ्या जुन्या इमारतीचे बांधकाम पाडून ते बांधकामाचे संपूर्ण जुने साहित्य नाल्यात रस्त्यावर टाकून पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बंद करून शासकीय जमीन लाटण्याचा गोरखधंदा यावल शहरातील एक कापड व्यापारी करीत असल्याने मनुदेवी भक्तांसह स्टॅन्ड व विरारनगर परिसरातील नागरिकांमध्ये मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

यावल शहरात काही विकासक शेत जमीन/औद्योगिक परवाना असलेल्या जमिनी विकत घेऊन रहिवास प्रयोजनार्थ बिनशेती प्रकरण करून प्लॉट पाडून कोट्यावधी रुपयांची कमाई करून घेत आहे. अक्सानगर जवळ यावल शहरातील चार ते पाच विकासकांनी एकत्रितपणे शेत जमीन खरेदी करून ती शेत जमीन बिनशेती करून प्लॉट पाडण्याच्या प्रक्रियेत बिनशेती जमिनीला लागून असलेल्या कांतोळी नावाच्या नाल्यात व शासकीय जागेवर भराव टाकून अतिक्रमण करून रस्ता तयार केला आहे, याबाबत यावल तहसील कडे आणि यावल तलाठी सर्कल यांच्याकडे रितसर तक्रार सुद्धा करण्यात आली होती आणि आहे,परंतु काय कारवाई झाली हे गुलदस्त्यात दडपून आहे त्याचप्रमाणे फैजपूर रोडवरील श्री मनुदेवी मंदिराला लागून असलेल्या सोमवार जुन्या अट्रावल रस्त्यावरुन नाल्यातून यावल एस.टी.स्टँड व विरारनगर या एक ते दोन किलोमीटर परिसरातील पावसाळ्यात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जात असते

अशा या सार्वजनिक वापराच्या रस्त्यावर तथा नाल्यात एका जुन्या भल्यामोठ्या इमारतीचे बांधकाम पाडलेल्या साहित्याचा शासकीय जागेवर भराव टाकून एक विकासक नैसर्गिक पाण्याचा प्रवाह तसेच सार्वजनिक वापराचा रस्ता कायमचा रस्ता बंद करून लाटण्याचा गोरखधंदा करीत आहे. याकडे यावल तहसीलदार, मंडळाधिकारी, यावल तलाठी यांच्यासह नगरपरिषद मुख्याधिकारी व नगरपरिषद बांधकाम अभियंता यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून संबंधित सर्व यंत्रणेने आपली जबाबदारी व कर्तव्य लक्षात घेऊन सदरील जागेचा पंचनामा करून शासकीय जमिनीवर भराव टाकुन अतिक्रमण केल्याप्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी संपूर्ण यावल विरारनगर परिसरातून होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!