स्वावलंबी भारत; पंतप्रधान मोदींनी दिलं तरुणाईला मेड इन इंडिया अँपचं चॅलेंज
नवी दिल्ली: आत्मनिर्भर भारताचा नारा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेत त्यांनी देशातल्या तरुणाईला एक चॅलेंज दिलं असून जागतिक दर्जाचे Made In India App बनविण्याचं आवाहन केलं आहे. (Aatmanirbhar Bharat App Innovation Challenge ) सध्याचं युग डिजिटलचं असून एका क्लिकवर सगळी कामं आणि व्यवहार होत आहेत. कोरोनामुळे त्याचं महत्त्व आणखी वाढलं आहे. त्यामुळे विदेशी तंत्रज्ञानावर विसंबून न राहता स्वदेशाला उत्तेजन देण्यासाठी पंतप्रधानांनी हे चॅलेंज दिलं आहे. तरुणांमध्ये नव्या गोष्टी करण्याची प्रचंड ऊर्जा आणि स्टार्टअपच्या माध्यमातून ते अनेक नव्या गोष्टी करण्यासाठी धडपडत असतात. अशा ऊर्जावान तरुणांसाठी हे आव्हान असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. तुमच्याकडे ज्या नव्या कल्पना आहे. त्याचा वापर करून इनोव्हेशनच्या माध्यमातून असे Apps तयार होऊ शकतात. त्यासाठी हे चॅलेंज असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. त्यासाठी पंतप्रधानांनी LinkedInवर लेखही लिहिला आहे. त्यात त्यांनी या स्पर्धेची विस्तृत माहिती दिली आहे. त्या माध्यमातून यात तरुणांना सहभागी होता येणार आहे.
Today there is immense enthusiasm among the tech & start-up community to create world class Made in India Apps. To facilitate their ideas and products @GoI_MeitY and @AIMtoInnovate are launching the Aatmanirbhar Bharat App Innovation Challenge. https://t.co/h0xqjEwPko
— Narendra Modi (@narendramodi) July 4, 2020
सरकारने नुकतेच 59 चिनी Appsवर बंदी घातली होती. या Appsमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचा दावा सरकारने केला होता. भारताने सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात जगभरात आपलं नावं केलंय. मात्र भारताचे स्वत:चे प्रॉडक्ट्स जागतिक पातळीवर फारच कमी आहेत. संशोधनात आणि गुंतवणुकीत आपण कमी पडत असल्याची तक्रार केली जाते. आता या उपक्रमाच्या माध्यमातून केंद्र सरकारने तरुणांना प्रोत्साहन दिलं असून चांगल्या सूचना आणि कल्पनांना सरकारही पाठबळ देणार आहे. आत्मनिर्भर भारत योजनेत हा मोठा उपक्रम समजला जातो.