हद्दपार मुलास आश्रय दिल्या प्रकरणी आई-वडिलांवर गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) एक वर्षाकरता जिल्ह्यात हद्दपार असलेला आरोपीचा शहरात वावर असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्याला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एवढेच नव्हे तर आरोपी हद्दपार असल्याचे माहित असून देखील त्याला आश्रय देणाऱ्या आई-वडिलांही पोलिसांनी अटक केली आहे.
यासंदर्भात सविस्तर असे की, पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना गुप्त माहिती मिळाली होती की, गु.र.न. 10:51 2020 भादवि कलम 307, 395, 397, 456, 143, 147, 149 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी रिजवान उर्फ काल्या गयासुद्दीन शेख (रा.अजमेरी गल्ली, तांबापुरा) हा त्याच्या घरी आला आहे. तसेच त्याला त्याच्या आई-वडिलांनी आश्रय दिला आहे त्यानुसार एमायडिसी पोलिसांचे पथक रिजवान च्या घरी गेली असता त्याच्या आई-वडिलांनी तो घरात नसल्याचे सांगितले. परंतु पोलिसांनी घराची झाडाझडती घेत असता रिजवानची आई जकियाबी ही वरच्या मजल्यावर पळत-पळत गेली व पोलीस आई हैं छुप जा, असे बोलली. तेव्हा पोलिसांनी वरच्या मजल्यावर जाऊन पाहता टेंटच्या सामानाच्या मागे रिजवान ऊर्फ काल्या हा लपलेला होता. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. यासंदर्भात पो.हे.कॉ इमरान अली युनिस अली सय्यद यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिजवान उर्फ काल्या गयासुद्दीन शेख, गयासुद्दीन शेख कबीरोद्दीन शेख, जकीयाबी गयासुद्दीन शेख (सर्व रा. अजमेरी गल्ली तांबापुरा) यांच्याविरुद्ध मुंबई अधिनियम 142 सह कलम 212 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. रिजवान तांबापुरातील शिकलकर व हटकर यांच्या दंगलीच्या गुन्ह्यात देखील अटक होणार आहे. सदरची कारवाई सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, सहाय्यक फौजदार रामकृष्ण पाटील, पो.ना इम्रान सय्यद, पो.का मुकेश पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, सपना येरगुंटला अशांनी केली आहे.