धक्कादायक; धावत्या ट्रेन मध्ये महिला पत्रकाराचा विनयभंग
भुसावळ (प्रतिनिधी)। महिलांवरील अत्याचाराचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असतांना, आपल्या पतीसह प्रवास करणाऱ्या एका महिला पत्रकाराचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार मंगला एक्सप्रेसमध्ये घडला आहे. पुन्हा महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी शेख आबीद हरून खान (वय-२०, रा.दुबई मोहल्ला, धारणी, अमरावती) या तरुणाविरुद्ध भुसावळात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, यासंदर्भात पिडीत महिला पत्रकाराने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २९ ऑक्टोबर रोजी मंगला एक्सप्रेसने आपल्या पतीसह प्रवास करत होत्या. खंडवा रेल्वे स्थानक गेल्यानंतर त्या स्वच्छता गृहात गेल्या होत्या. यावेळी आरोपी शेख आबीद हरून खान याने स्वच्छता गृहाचा दरवाजा जोरजोराने ठोठावून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करून लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले. पिडीत महिलेने भुसावळ रेल्वे स्थानक आल्यानंतर याबाबत भादवी कलम ३५४ अन्वये शेख आबीद हरून खान (वय-२०, रा.दुबई मोहल्ला, धारणी, अमरावती) या तरुणाविरुद्ध भुसावळ जीआरपीएफमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना खंडव्याच्या हद्दीत घडली असल्यामुळे शून्य क्रमांकाने गुन्हा व आरोपी खंडवा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.