धक्कादायक! मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात शिकाऊ महिला डॉक्टरचा वॉर्डबॉयकडून विनयभंग
मुंबई: मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. एका शिकाऊ महिला डॉक्टरची वॉर्डबॉयने छेड काढली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी वॉर्डबॉयला अटक केली आहे
जे. जे. रुग्णालयात पीडिता शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करते. रुग्णालयातील एका वॉर्डबॉयनं तिची छेड काढली आहे. हा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री घडला. ही महिला डॉक्टर रुग्णाची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी विभागात जात होती. त्याचवेळी ड्युटीवर असलेल्या वॉर्डबॉयनं तिचा विनयभंग केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे ती प्रचंड घाबरली. तिने आरडाओरडा केला. त्यानंतर आरोपी वॉर्डबॉय तेथून पसार झाला.
या प्रकरणी महिला डॉक्टरनं पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी वॉर्डबॉयविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
वाचा- न्हावी-फैजपुर परिसराच्या शेतशिवारात सामूहिक अत्याचाराच्या चर्चेला उधान !
आरोपी वॉर्डबॉयविरोधात याआधीही अनेक तक्रारी आहेत. त्याची वर्तणूक चांगली नसल्याचे समोर आले आहे. याआधीही लोकांना शिवीगाळ, मारहाण केल्याच्या तक्रारी त्याच्याविरोधात करण्यात आलेल्या आहेत. अनेकांनी रुग्णालय व्यवस्थापन आणि पोलिसांकडेही तक्रारी केल्या आहेत. या आरोपीविरोधात अन्य कोणत्या पोलीस ठाण्यांमध्ये कोणता गुन्हा दाखल आहे का, याची चौकशी पोलीस करत आहेत. दरम्यान, करोनाच्या संकटकाळात डॉक्टर, आरोग्य सेवक अहोरात्र रुग्णांची सेवा करत आहेत. अशावेळी रुग्णालयातच महिला डॉक्टरचा विनयभंग होत असल्याची घटना चिंताजनक आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, दोषींवर कठोर कारवाई करायला हवी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
काही दिवसांपूर्वीच क्वारंटाइन सेंटरमध्ये एका तरुणीची दोघांनी छेड काढल्याची घटना घडली होती. मालाड परिसरातील क्वारंटाइन सेंटरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला होता. करोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगून तिला क्वारंटाइन सेंटरला बोलावले होते. त्यानंतर तेथे काम करत असलेल्या दोघांनी तिची छेड काढली होती. या प्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. १५ जून रोजी ही घटना घडली होती. मालाड पश्चिमेला राहणाऱ्या तरुणीला करोनाबाधित असल्याचे सांगून क्वारंटाइन सेंटरला बोलावले होते. त्यानुसार तरुणी क्वारंटाइन सेंटरला पोहोचली. तिथे गेल्यानंतर आरोपींनी या तरुणीला तू करोनाबाधित नाहीस असे सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी तुला घरी सोडण्यात येईल असेही सांगितले. तरुणी रुममध्ये एकटी असल्याचे पाहून आरोपींनी तिची छेड काढली. दुसऱ्या दिवशी तरुणीचे पालक आले आणि तिला घरी घेऊन गेले. या घटनेने मानसिक धक्का बसलेल्या तरुणीने घटनेची माहिती आईला दिली. त्यानंतर पालकांनी तिला सोबत घेतले आणि पोलीस ठाणे गाठले. २० जून रोजी या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा