“१८ वर्षांपुढील सर्वांच्याच लसीकरणाला परवानगी द्या” इंडियन मेडिकल असोसिएशनचे पंतप्रधानांना पत्र
मंडे टू मंडे वृत्तसंकलन ।
मुंबई (प्रतिनिधी) : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घालण्यास सुरुवात केली असून, बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर १८ वर्षांपुढील सर्वांनाच लस देण्याला परवानगी द्यावी, अशा आशयाची मागणी करणारे पत्र इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.
सद्यस्थितीत ४५ वर्षांपुढील सगळ्यांना लस दिली जात आहे. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावाचा झपाटा पाहता लसीकरण मोहिमेला वेग देणे गरजेचे असून, १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्यात यावी. तसेच खासगी क्षेत्रातील दवाखान्यांनाही लसीकरणाची परवानगी दिली जावी, अशी आम्ही या पत्राद्वारे मागणी करीत आहोत, असे आयएमएने पंतप्रधानांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना सर्वांना लसीकरण प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक करावे, असेही या पत्रात सुचविण्यात आले आहे. सिनेमा, कला, क्रीडा, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात तातडीने कठोर निर्बंध लादून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखावा व संक्रमण साखळी तोडावी, त्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, असेही पत्रात आयएमएने म्हटले आहे.
ऑगस्टपर्यंत लसीचा प्रभाव दिसून येणार
एम्सचे माजी संचालक डॉ. एम. सी. मिश्रा यांनी सांगितले की, देशामध्ये आतापर्यंत सुमारे सात कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. यामध्ये लसीचे दोन डोस खूपच कमी लोकांना देण्यात आले आहेत. जुलै-ऑगस्ट महिन्यापर्यंत लोकसंख्येतील मोठ्या वर्गाला कोरोनाची लस दिली जाईल. एम्सचे कम्युनिटी मेडिसिनचे प्राध्यापक डॉ. संजय राय यांनी सांगितले की, देशात सद्य:स्थितीत प्रत्येक १०० लोकांमधील सुमारे पाच जणांनाच कोरोनावरील लस देण्यात आली आहे.
मास्कच्या वापरामुळे संसर्गाच्या दरात वेगाने घट
हल्लीच अमेरिकेत झालेल्या संशोधनानुसार मास्कच्या वापरामुळे फैलाव झालेल्या भागात संसर्गाच्या दरात वेगाने घट होत असल्याचे दिसून आले आहे. ज्या ठिकाणी हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये कर्मचाऱ्यांकडून मास्कचा वापर करण्यात आला नाही. त्या ठिकाणी एक लाख लोकांमागे ६४३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला.