जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास ग्रा.पं.चा कर माफ, रावेर तालुक्यातील ग्रामपंचायतचा कौतुकास्पद निर्णय
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील एका ग्रामपंचायतीने एक मोठा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. सन २०२५/२०२६ या शैक्षणिक वर्षात जे पालक आपल्या पाल्यांचा जिल्हा परिषद शाळा कुसुंबा तालुका रावेर येथे इयत्ता १ली मध्ये प्रवेश घेतील,तसेच खासगी शाळेमधून नाव कमी करून इयत्ता २ री ते ४ थी मध्ये प्रवेश घेतील अशा पालकांचे सन २०२५/२०२६ या आर्थिक वर्षाचे ग्राम पंचायत कुसुंबे खुर्द चे घरपट्टी व पाणीपट्टी कर माफ करण्यात येईल असा एकमुखी कौतुकास्पद निर्णय आज पेसा ग्रामपंचायत कुसुंबा खुर्द तालुका रावेर जिल्हा जळगांव येथील ग्राम पंचायत मासिक सभेत घेण्यात आला.
रावेर तालुक्यातील कुसुंबा खुर्द (तालुका रावेर) येथील पेसा ग्रामपंचायतची मासिक सभा आज दिनांक 13 जून २०२५ रोजी सरपंच मुबारक उखर्डु तडवी (सर) यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी रुबियाना रशीद तडवी यांनी जिल्हा परिषद जळगांव चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आय.ए.एस. मॅडम श्रीमती मिनल करनवाल मॅडम यांनी दिलेले पत्राचा संदर्भ देत सांगितले की या चालु शैक्षणिक वर्षापासुन जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये CBSC पॅटर्न राबविण्यात येणार आहे व मुलांचे सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण हे फक्त जिल्हा परिषद शाळाच देऊ शकतात. त्यामुळे जळगांव जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत दाखल करण्याचे आवाहन केलेले आहे.
तेव्हा ग्रामपंचायत सदस्य प्रदीप भिमराव सपकाळे यांनी देशात आणि राज्यात सुरू असलेले शिक्षणाचे खाजगीकरणामुळे सरकारी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या सरकारी शाळा वाचवण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करीत सन २०२५/२०२६ या शैक्षणिक वर्षात जे आई वडील आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळा कुसुंबे येथे इयत्ता १ली मध्ये प्रवेश घेतील व खासगी शाळेमधून नाव कमी करून इयत्ता २री ते ४थी च्या वर्गात प्रवेश घेतील अशा पालकांचे या आर्थिक वर्षाचे ग्रामपंचायत कर माफ करण्यात यावे असा ठराव मासिक सभेत मांडला असता उपसरपंच मुकेश नरेंद्र पाटील यांनी या ठरावला अनुमोदन दिले व सर्वानुमते एकमताने सदर ठराव मंजूर करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य गफूर रुबाब तडवी,सिंधूबाई जयवंतराव जावळे, पुजा मुकेश पाटील,जुबेदा हसन तडवी, मैंराज फिरोज तडवी, कल्पना अय्युब तडवी, हजर होते. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी तथा ग्रामसेवक रुबियाना रशीद तडवी मॅडम यांनी सदर निर्णया बद्दल सर्व ग्रामपंचायत कमिटीचे अभिनंदन केले व निश्चितच या निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळा कुसुंबे येथील शाळेची पटसंख्या वाढेल असा विश्वास व्यक्त केला.

