कोरोना योद्धांच्या मदतीला SMART WATCH; रुग्णाजवळ न जाता डॉक्टरांना मिळणार माहिती
आयआयटी हैदराबादने कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी नेमोकेअर रक्षा प्लस हे घड्याळासारखं एक उपकरण तयार केलं आहे.
हैदराबाद : कोरोना रुग्णांची सेवा करणारे कित्येक डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. कोरोना रुग्णाच्या तपासणीसाठी त्यांना वारंवार रुग्णाच्या जवळ जावं लागतं. ज्यामुळे त्यांना कोरोनाव्हायरसची लागण होण्याचा धोका अधिक वाढतो. अशा परिस्थिती आता या कोरोना योद्धांच्या मदतीला येणार आहे ते स्मार्ट वॉच (SMART WATCH). ज्यामुळे रुग्णाच्या जवळ न जाताच त्याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
आयआयटी हैदराबादच्या (IIT Hyderabad) विद्यार्थ्यांनी असं उपकरण तयार केलं आहे, जे एखाद्या घड्याळाप्रमाणे आहे. हे उपकरण रुग्णाच्या मनगटावर बांधल्यानंतर रुग्णाची संपूर्ण माहिती डॉक्टरांपर्यंत पोहोचेल. डॉक्टरांना रुग्णाजवळ जाण्याची गरज नाही. रुग्णापासून दूर राहूनही त्याच्यावर आणि त्याच्या आरोग्यावर लक्ष ठेवता येणार आहे.
नेमोकेअर रक्षा प्लस (Nemo care raksha plus) असं या उपकरणाचं नाव आहे. नेमोकेअर रक्षा प्लसमुळे डॉक्टरांना रुग्णाजवळ जाऊन स्वत: तपासणी न करता त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी, हार्ट रेट, रेस्पिरेटरी रेट आणि शरीराचं तापमान याची माहिती मिळेल.
कोरोना रुग्णांच्या आरोग्य परीक्षणात त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी तपासणं महत्त्वाचं असल्याचं आयसीएमआरने सांगितलं आहे. कोरोनाव्हायरसमुळे रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊ लागतं. शरीरात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन नसल्याने रुग्णांना श्वास घ्यायलाही त्रास होतो, त्यांचा श्वास कोंडू लागतो. वेळेत त्यांना ऑक्सिजन मिळालं नाही तर मृत्यूही ओढावू शकतो. अशात हे उपकरण रुग्णाजवळ न जाता सातत्याने त्याच्या ऑक्सिजन पातळी तपासण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.
शिवाय रुग्णाला किती वेळ खोकला आला आणि रुग्ण कुठे कुठे गेला याची माहिती देण्यासही हे उपकरण सक्षम आहे. यामध्ये जिओ ट्रॅकिंग फिचर आहे, ज्यामुळे उपकरण रुग्णाच्या मनगटावर बांधल्यानंतर रुग्णाच्या ठिकाणाची माहिती मिळू शकते.
नेमोकेअर कंपनीचं हे उपकरण असून नेमोकेअर रक्षाचे अपडेटेड व्हर्जन आहे. नवजात बालकांच्या तपासणीसाठी नेमोकेअर रक्षा तयार करण्यात आलं होते. एक रुपयाच्या नाण्याच्या आकाराचं हे उपकरण आहे. जे बाळाच्या शरीरावर बांधलं जातं आणि बाळाला हात न लावता त्याची तपासणी केली जाऊ शकते. रक्षा प्लसमध्ये जिओ ट्रॅकिंग आणि खोकला मॉनिटर करण्याचे अधिक फिचर्स आहेत.
सध्या या उपकरणाचं हैदराबाद आणि बंगळुरूतील दोन रुग्णालयात क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. ज्यामध्ये हे उपकरण परिणामकारक असल्याचं सांगितलं जातं आहे. लवकरच कोरोनाच्या लढ्यात हे उपकरण कोरोना योद्धांच्या मदतीला येईल.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा