ब्रेकिंग: सर्व खासगी कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम ? राज्य सरकार मोठा निर्णय घेणार ?
मंडे टू मंडे वृत्तसंकलन ।
मुंबई : (प्रतिनिधी)। वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. राज्य शासन आणि प्रशासनाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यात दररोज कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ होत असून अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन व कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
दरम्यान, राज्यात रात्री आठ नंतर जमावबंदी लागू करण्यात आली असून मॉल्स, हॉटेल, चित्रपटगृहे व इतर दुकाने देखील रात्री आठच्या आधीच बंद करण्याचे आदेश राज्य शासनाने लागू केले आहेत. राज्यातील जनतेकडून तसेच विरोधी पक्ष व सरकारमधीलही काही प्रतिनिधींकडून लॉकडाऊनला मोठा विरोध आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाऊन न लावता काही कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यानुसार, ‘वर्क फ्रॉम होम’साठी सरकारची चाचपणी सुरु आहे.लॉकडाऊन पेक्षा जास्तीत जास्त लोकांना घरी बसून कसं काम करता येईल यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
नागरिक घरी राहिल्यास रस्त्यावरची गर्दी कमी होईल, ट्रेन, बस, आणि मेट्रोची गर्दी कमी होईल. त्यामुळे लवकरच वर्क फ्रॉम होम सुरु होण्याची शक्यता आहे. आयटी सेक्टर व इतर ऑफिसेसला सरकार ‘वर्क फ्रॉम होम’साठी आदेश देणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे.