यूजीसीच्या सुधारित गाईडलाईन जारी; आता अंतिम वर्षाच्या परिक्षा घेता येणार !
नवी दिल्लीः करोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे विद्यापीठ परीक्षा खोळंबल्या होत्या. केंद्रीय गृहमंत्रालयाने या परीक्षांना परवानगी दिली आहे. यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठ परीक्षा घेण्यात याव्यात, असं गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. आता विद्यापीठे आणि महाविद्यालये ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊ शकतील. गृहमंत्रालयाच्या परवानगीनंतर यूजीसीने विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या परीक्षांसंदर्भात सुधारित गाईडलाईन जारी केल्या आहेत. यामध्ये जुलै महिन्यात परीक्षा घेण्याबाबतची सक्ती रद्द केली आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा अनिवार्य असल्याचे सांगून त्या सप्टेंबरच्या अखेरीस घेण्यास परवानगी दिली. ही परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या माध्यमातून घेतली जाऊ शकते. तसेच यूजीसीने विद्यापीठ आणि महाविद्यालयांना अशी सूट दिली आहे की, ‘स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन ३० सप्टेंबरपर्यंत या परीक्षा कधी घेऊ शकता. पण यूजीसीला याबाबत माहिती द्यावी लागेल.’
The terminal semester(s)/final year(s) examinations be conducted by the universities/institutions by the end of September 2020: University Grants Commission (UGC) in its revised guidelines https://t.co/ILr4lPdlzQ
— ANI (@ANI) July 6, 2020
यापूर्वी यूजीसीने २९ एप्रिला गाईडलाईन जारी करून सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना १ ते १५ जुलै दरम्यान अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास सांगितले होते. तर पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या परीक्षेसाठी १५ ते ३० जुलैपर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली होती. पण या दरम्यान कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यांनी आणि विद्यापीठांनी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मानव संसाधन विकार मंत्रालयाने यूजीसीला नव्याने परीक्षासाठी दिलेल्या गाईडलाईनचा आढावा घेण्याचे निर्देश दिले होते.
त्यानंतर युजीसीने हरयाणा केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. या अहवालानंतर यूजीसी बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. यूजीसीने यासोबत विद्यापीठे आणि महाविद्यालयांना असे निर्देश दिले आहेत की, ‘यानंतरही एखादा विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा देऊ शकत नसले तर त्याचे योग्य कारण मिळाल्यास त्याला परीक्षा देण्याची पुन्हा एकदा संधी द्या.’ सुधारित गाईडलाईनमध्ये यूजीसीचा जास्त भर अंतिम वर्षाच्या परीक्षेवर आहे. पहिल्या आणि दुसऱ्या वर्षासाठी यूजीसीने विद्यापीठांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे पदोन्नती करण्याच्या सूचना आधीच दिल्या आहेत.