सकाळी अंत्यसंस्कार केलेला भाऊ संध्याकाळी दारात हजर
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
बडोदा (वृत्तसंस्था)। आपला जवळच्या माणूस हे जग सोडून गेल्याने आपल्याला मोठा धक्का बसतो. ती व्यक्ती परत यावी असे आपल्याला नेहमी वाटत असते. असाच एक प्रकार बडोद्यामध्ये घडला आहे. आपल्या मृत भावावर अंत्यसंस्कार करून घरी परतताच संध्याकाळी भाउ घराच्या दारात येऊन उभा राहिला. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ज्या भावावर सकाळी अंत्यसंस्कार केले तो पुन्हा जिवंत कसा झाला हा प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहिला.
गुरूवारी सकाळी बडोदा पोलिसांना स्मशानभूमी जवळ एका अज्ञान व्यक्तीचा मृतदेह सापडला. मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी त्याचे फोटे सोशल मीडियावर व्हायरल केले. हे व्हायरल झालेले फोटो पाहून बडोद्याचा रहिवासी असलेला बंटी शर्माने ही व्यक्ती माझा भाऊ असून त्याचे नाव दिलीप असल्याचे सांगितले. त्याचे मानसिक संतुलन बिघडल्याने गेली ४-५ दिवस तो गायब झाला असल्याची माहिती त्याने पोलिसांनी दिली. पोस्टमर्टम नंतर बंटी शर्माने मृत दिलीपची बॉडी ताब्यात घेतली. मृत व्यक्ती आपला भाऊ समजून त्यांनी त्याच्यावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कार करून घरी जाताच दिलीपला घराच्या दारात पाहून सगळेच चकित झाले. दिलीप जिवंत असल्याने त्यांच्या कुटुंबियांना खूप आनंद झाला. पण आपण एका अज्ञान व्यक्तीवर अंत्यसंस्कार केल्याने कुटुंबियांना त्याची नोंद करण्यासाठी पोलिसात जाण्यास भिती वाटत होती. दिलीपच्या कुटुंबियांचे असे म्हणणे आहे की, फोटो आणि खऱ्या चेहऱ्यातील दिलीपला ओळखण्यात चुक झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीजवळ आढळून आला ती व्यक्ती आदीवासी वस्तीत राहणारी होती. त्या व्यक्तिच्या कुटुंबियापर्यत अस्ती पोहचवण्यात आल्या असल्याचे शेवटी पालिसांनी सांगितले.