हिंगणे ता.बोदवड येथे 5 MVA क्षमतेचे विज उपकेंद्र मंजूर: आ. पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर (प्रतिनिधी)। बोदवड तालुक्यातील हिंगणे येथील 10 ते 12 गावांची विजेची समस्या सोडविण्यासाठी या ठिकाणी कृषी आकस्मिक निधी (ACF) अंतर्गत 5 MVA क्षमतेचे विज उपकेंद्र उभारण्यात यावे अशी मागणी राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत व जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या कडे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली होती व सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. या पाठपुराव्याला यश आले असून हिंगणे ता.बोदवड येथे अंदाजित 5 कोटी रु खर्चाची तरतूद असलेले 5 MVA क्षमतेचे विज उपकेंद्र मंजूर झाले असून लवकरच उपकेंद्राच्या कामाला सुरुवात होणार आहे. यामुळे परिसरातील 10 ते 12 गावातील गावठाण व शेतीक्षेत्राची तसेच आमदगाव शिवारातील धरणावरील विजेची समस्या कायमची सुटणार आहे. अशी माहिती आमदारांचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी , प्रशांत पाटील यांनी दिली.
बोदवड तालुक्यातील हिंगणा, नांदगाव , नाडगाव , शिरसाळा, चिचखेडा सिम तसेच आमदगाव शिवारातील धरण व इतर 5 ते 7 गावांच्या गावठाण आणि कृषी पंपाची समस्या कायमची मिटणार यामुळे परिसरातील गावकऱ्यांनी शेतकऱ्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.