११० किलो गौवंशाचे मांस जप्त, एकास अटक, रावेर पोलिसांची कारवाई
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील के-हाळा बु. येथे गौवंशाचे मांस विक्री करणाऱ्या एका व्यक्तील पकडून त्याच्या कडून सुमारे ११० किलो
गौवंशाचे मांस जप्त केले असून त्याची किंमत सुमारे २२ हजार रुपये आहे. याप्रकरणी शेख पिरु शेख लाल याला पोलिसांनी अटक केली असून रावेर पोलिस स्टेशनला या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावेर तालुक्यातील के-हाळा बु. गावात एक इसम अवैधरित्या गौवंशाचे मांस विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे यांना कारवाईचे आदेश दिले.
उपनिरीक्षक घनश्याम तांबे यांनी पोलिस पथक तयार करून के-हाळा बु. मधील इंदिरा नगर परिसरात छापा टाकून शेख पिरु शेख लाल वय ५५ वर्ष, रा. कुरेशी वाडा, रसलपुर. ता. रावेर. हा इसम गौवंशाचे मांस खुल्या जागेत विक्री करताना आढळून आला. त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून सुमारे ११० किलो मांस जप्त करण्यात आले असून त्याची किंमत अंदाजे २२,००० रुपये इतकी आहे.
हे मास पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप गाढे यांच्या तपासणीत गौवंशाचे असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीविरुद्ध रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईत पोउनि घनश्याम तांबे यांच्यासह श्रावण भील, पोहेकॉ सुनील वंजारी, नितीन डांबरे, योगेश महाजन व पोकॉ राहुल परदेशी यांनी सहभाग घेतला.