भुसावळ मध्ये ३० हजार लिटर ‘इंधन’ जप्त ! ऑईल माफियांचे धाबे दणाणले ‘सुरत’ कनेक्शन उघड
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भुसावळ तालुक्यात एक मोठी कारवाई करण्यात आली. भुसावळ तालुक्यातील किन्ही शिरपूर एमआयडीसी परिसरातील ‘नमो एनर्जी ऑईल’ कंपनीच्या गोदामात सुरू असलेल्या संशयास्पद इंधन साठवणुकीवर भुसावळ तालुका पोलिस आणि पुरवठा विभागाने रविवार दि. १८ जानेवारी रोजी दुपारी छापा टाकला. या धाडीत १५ लाख रुपये किमतीचे टँकर, २१ लाख रुपये किमतीचे तब्बल ३० हजार लिटर डिझेल सदृश ज्वलनशील पदार्थाने भरलेला टँकर जप्त करण्यात आला असून, असा एकूण ३६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस तपासात याचे गुजरात कनेक्शन असल्याचे उघड झाले. या कंपनीवर झालेल्या कारवाईमुळे जिल्ह्यातील भेसळखोर आणि ऑईल माफियांचे मात्र धाबे दणाणले आहे.
भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेला किन्ही एमआयडीसीमधील प्लॉट नंबर F-50/51 वरील ‘नमो एनर्जी ऑईल’ या कंपनीत संशयास्पद हालचाली सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. तेथे एक टँकर उभा असून त्यात डिझेलसारखा ज्वलनशील पदार्थ असल्याची खबर मिळताच यंत्रणा कामाला लागली.
भुसावळच्या तहसीलदार यांच्या आदेशान्वये पुरवठा निरीक्षण अधिकारी रोशना रेवतकर, पोलिस उपनिरीक्षक पूजा अंधारे आणि त्यांच्या पथकाने पंचासमक्ष रविवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास कंपनीच्या आवारात घुसून छापा टाकला.
या वेळी पथकाला घटनास्थळी जी.जे. २४ – व्ही. ७६५५ (G) 24 V 7655) क्रमांकाचा टँकर उभा असल्याचे आढळून आले. पथकाने टँकरच्या कॉकमधून द्रव पदार्थ काढून पाहणी केली असता, त्याला डिझेलसारखा उग्र वास येत असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी उपस्थित कंपनी मालकाचे भाऊ अमीन इक्बाल तेली (रा. सुरत) यांची चौकशी केली असता, उडवाउडवीची उत्तरे मिळाली. हा टँकर ट्रान्सपोर्टचा असून तो भाडे करारावर आणल्याचे सांगण्यात आले, मात्र चालक जागेवर नव्हता.
तेव्हा जागेवरच टँकरमधील इंधनाची घनता (Density 712) आणि तापमान (Temperature 20) मोजण्यात आले.पण हा पदार्थ बायोडिझेल आहे की भेसळयुक्त डिझेल, याची खात्री करण्यासाठी नमुने सीलबंद करून प्रयोगशाळेत (CA) पाठवण्यात आले आहेत. या कारवाईत १५ लाख रुपये किमतीचा टँकर आणि २१ लाख रुपये किमतीचे ३० हजार लिटर इंधन (७० रुपये प्रति लिटर दराने) असा एकूण ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा टँकर आता भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात सुरक्षिततेसाठी हलवण्यात आला आहे.
सदरची कारवाई पुरवठा निरीक्षण अधिकारी रोशना रेवतकर, पोलिस उपनिरीक्षक पूजा अंधारे, उपनिरीक्षक रवी नरवडे हवा.उमाकांत पाटील गोपाळ गव्हाणे, रतन परदेशी, विकास सातदिवे, राहुल वानखेडे यांच्या पथकाने केली.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
