सप्तशृंगी गडावर निघालेल्या भाविकांच्या कारला भीषण अपघात, ५ भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती
नाशिक, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सप्तशृंगीगड येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला. सप्तशृंग गडावरील घाट रस्त्यावरुन इनोव्हा कार क्रमांक एम.एच.१५ बी.एन.०५५५ ही खाली कोसळली आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. इनोव्हा कारमध्ये पिंपळगाव चिंचखेड येथील दोन महिला तीन पुरुष भाविक होते.
सप्तशृंगी गडावरुन इनोव्हा कार दरीत कोसळली. गणपती पॉइंटजवळ संरक्षण कठडा तोडून कार दरीत कोसळली आहे. दर्शन घेऊन परतताना हा अपघात झाला आहे. कार मधील पाच जण दगावल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थानिक नागरिक व आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून मदत कार्य सुरु करण्यात आले आहे. १००० फूट खोल दरी असल्याने मदत कार्यात अडचणी येत आहेत.
अपघातग्रस्थांना वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असून स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाकडून बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. पण दरी खोल असल्याने बचावकार्यात अडथळा येत असल्याची माहिती मिळत आहे. खोल दरीत जिथे कार कोसळली आहे तिथे पाच-सहा जण पोहोचलेले दिसत आहेत. त्यांच्याकडून अडकलेली गाडी बाजूला करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेतील अपघाग्रस्तांना जीव वाचावा यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच कारदेखील बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.दरम्यान, अपघात नेमका कसा घडला? त्याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

