यावल तालुक्यातील तरुणाचा चिखलात गुदमरून मृत्यू
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये शेळी पडल्याने त्या शेळी ला काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाचा खड्ड्यातील चिखलात जीव गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना यावल तालुक्यातील कोरपावली गावात दि. ८ जून रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.
शेळ्या मेंढ्या पाळून उदरनिर्वाह करणाऱ्या जयेश संतोष महाजन (वय १८, रा. कोरपावली, ता. यावल) हा तरुण नेहमी प्रमाणे ८ जून रोजी शेळ्या मेंढ्या चारून येत असताना कोरपावली गावाच्या बाहेर असणाऱ्या सांडपाण्याच्या खड्ड्यातील चिखलात एक शेळी पडल्याने तिला वाचवण्यासाठी तो देखील खड्ड्यात उतरण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्याचा तोल जाऊन तो चिखलात रुतल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत त्याला खड्ड्यातून काढून यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जयेशला तपासून मृत घोषित केले. याबाबत यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.